✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.15 जानेवारी) :- बांबु तोडण्याचे काम करणाऱ्या इसमास वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. नंतर त्या वाघाला जेरबंद करण्यात आले आहे. मृतक चे नाव लालसिंग बरेलाल मडावी, वय ५७ वर्ष असे आहे.
आज १४ जानेवारी रोजी बल्हारशाह वनपरिक्षेत्रात बांबु युनीट क्रं ५ बल्लारपूर येथे लालसिंग बरेलाल मडावी, वय ५७ वर्ष, रा. मणिकपुर माल (बेहराटोला) तह.बिछाया, जि. मंडला, मध्यप्रदेश हे नियतक्षेत्र बल्हारशाह मधील राखीव वनखंड क्रमांक ४९३ मध्ये बांबु निष्कासनाची कामे करीत असतांना सकाळी १०.०० वाजताचे सूमारास त्यांचेवर वाघाने हल्ला करुन त्यांना जागीच ठार मारल्याची घटना घडली. घटनेची माहिती प्राप्त होताच सहाय्यक वनसंरक्षक (वनी व वन्य) मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर व वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह (प्रादे) हे अधिनस्त वनकर्मचारी यांचे सोबत तात्काळ मौका स्थळी हजर झाले.
मौक्यावर पाहणी केली असता लालगिंग बरेलाल मडावी यांच्या मृतदेहाजवळच वाघ बसुन होता. सदर वाघाला हुसकावुन लावण्याचा प्रयत्न केला असता वाघ हा वनकर्मचारी यांचे दिशेने चाल करुन येत होता. सदर वाघ हा मृतदेहाजवळ बराच वेळा पासून बसून असल्यामुळे दुपारी ४.०० वाजताचे सुमाराम अति शिघ्र दल बल्लारपूर यांना पाचारण करुन डॉ. कुंदन पोटचलवार, पशुवैद्यकीय अधिकारी, वन्यजीव उपचार केन्द्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात शुटर अविनाश फुलझेले, वनरक्षक यांनी वाघाला गनव्दारे डॉट मारुन सदर वाघाला बेशुध्द केले. सदर बेशुध्द वाघाची पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करुन त्यास पिंजऱ्यात बंद करुन पुढील तपासणी करीता वन्यजीव उपचार केन्द्र, चंद्रपुर येथे नेण्यात आले. सदर वाघ हा नर असुन अंदाजे ४ वर्षाचा असल्याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.
त्यानंतर मृत व्यक्तीचे शव ताब्यात घेवुन पोलीस विभागाचे कर्मचारी यांचे समक्ष मौका पंचनामा नोंदवुन शव शवविच्छेदना करीता पोलीस विभागाचे ताब्यात देण्यात आले व मृत व्यक्तीचे नातेवाईकास तात्पुरती सानूग्रह आर्थिक मदत देण्यात आले.
सदर कार्यवाही मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर चे उपवनसंरक्षक श्रीमती. श्वेता बोड्डू, यांचे मार्गदर्शनात उपविभागीय वनअधिकारी, राजुरा पवनकुमार जोंग व सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे यांचे नेतृत्वात वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह नरेश रामचंद्र भोवरे यांनी पुर्ण केली. सदर कार्यवाही दरम्यान पोलीस निरिक्षक सुनिल गाडे, क्षेत्र सहाययक के. एन. घुगलोत, व्हि.पी. रामटेके वनरक्षक सुधीर बोकडे, अनिल चौधरी, धर्मेन्द्र मेश्राम, सुरेन्द्रकुमार देशमुख, तानाजी कामले कु.वर्षा पिपरे, कु.उषा घोडवे, कु.वैशाली जेनेकर, कु.माया पवार, कु.पुजा टोंगे व आरआरयू बल्हारशाह पथक व पोलीस स्टेशन, बल्हारपुर चे पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले.
बल्हारशाह कारवा जंगल परिसरात हिश्व वन्यप्राण्यांचा वावर असल्यामुळे नागरीकांनी वनात प्रवेश करु नये असे आव्हान वनविभागा मार्फत करण्यात येत आहे.