चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या नियमबाह्य भरती विरोधात आंदोलन

🔹सिडीसीसी बैंक नोकर भरती विरोधात आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे आंदोलन सुरु

🔸साखळी ठिय्या आंदोलनाला अनेक मागासवर्गीय समाज संघटनेचा पाठिंबा

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.2 जानेवारी) :-

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या नोकर भरतीत मागासवर्गीयांचे आरक्षण डावलून व चुकीच्या एजन्सी मार्फत परीक्षा घेऊन कोट्यावधीचा भ्रष्टाचार केला जात असल्याने ही नोकर भरती प्रक्रिया त्वरित थांबवून मागासवर्गी्यांचे आरक्षण लागू करा व नव्याने भरती प्रक्रिया करा या मागणी करिता 

आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे साखळी ठिय्या आंदोलन सुरु झाले, या आंदोलनात मागासवर्गीय समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती अंतर्गत कुणबी एकता मंचचे अध्यक्ष इंजि. दिलीप झाडे, जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष आबिद अली,राष्ट्रीय तेली समाज संघटनेचे अध्यक्ष राजेश बेले, भोई समाज संघटनेचे अध्यक्ष बंडु हजारे, स्वराज्य शेतकरी संघटनेचे संस्थापक सुर्या अडवाले, पीपीआयडी चे जिल्हाध्यक्ष महेंद्र खंडाळे, महासचिव मिलिंद खोब्रागडे, चंद्रपूरच्या महिला जिल्हाध्यक्षा नभा वाघमारे, धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष संजय कन्नावार, गोंडी धर्मिय समाज संघटनेचे नेते रमेश मेश्राम, वाहतूक सेनेचे महेश वासलवार, झाडे सुतार समाज अध्यक्ष मंगेश बुरडकर, महाराष्ट्र नाभिक संघ दिनेश एकवनकर, अहिर समाज संघ अध्यज अनुप यादव, पद्माषाली समाजाचे महेश वासलवार, ओबीसी सेवा संघांचे सरचिटणीस राजु कुकडे, सुनील गुढे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

 चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकेचे संचालक मंडळ हे सन 2012 मध्ये निवडून आले असून त्यांची मुद्दत सन 2017 ला संपली आहे, मात्र न्यायालयीन खटले व अनेक संचालकांवर बैंकेत केलेल्या भ्रष्टाचार संबंधी गुन्ह्यामुळे नव्याने संचालक मंडळाची निवडणूक झालेली नाही, अशातच बैंकेत 360 पदाची नोकर भरती करण्याची अनुमती सहकार आयुक्त पुणे यांच्याकडून देण्यात आली होती.

पण बैंकेत नोकर भरतीत घोटाळा होतं असून ती पारदर्शकपणे होतं नसल्याने सन 2023 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोकर भरतीवर स्थगिती दिली होती, दरम्यान या स्थगिती विरोधात संचालक मंडळ मुंबई उच्च न्यायालयात गेलं आणि त्यावरची स्थगिती उठवली, पण स्थगिती उठवितांना ही नोकर भरती पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी टिसीएस कंपनीद्वारे भरती प्रक्रिया करा असा आदेश न्यायालयाने दिला होता.

पण कांग्रेस नेते तथा बैंक अध्यक्ष संतोष रावत यांनी नोकर भरती प्रक्रिया राबविताना मागासवर्गीयांचे (एससी, एसटी व ओबीसी ) आरक्षण लागू न करता व उच्च न्यायालयात टिसीएस द्वारे नोकर भरती प्रक्रिया राबविण्याची हमी दिली असतांना सुद्धा आयटीआय या बोगस कंपनी मार्फत भरती प्रक्रिया राबवली व त्यामुळे जवळपास 31 हजार पेक्षा जास्त परीक्षार्थी यांनी फॉर्म भरले असताना दिनांक 21 डिसेंबरला शिपाई पदासाठी घेतलेल्या पहिल्याच दिवशी ऑनलाईन पेपर मध्ये घोळ झाल्याने परीक्षार्थिनी कंपनी व्यवस्थापन व सिडीसीसी बैंक संचालक यांच्या विरोधात आंदोलन केले होते, त्यामुळे ती परीक्षा रद्द करण्यात आली, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 22 डिसेंबर 2024 ला घेण्यात आलेल्या लिपिक पदासाठी च्या भरतीत सुद्धा अनेक परीक्षा केंद्रावर घोळ झाल्याने परीक्षार्थी यांनी आक्रोश व्यक्त केला होता.

जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होतं नाही व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक प्रशासन सुरु असलेली भ्रष्ट नोकर भरती थांबवत नाही तोपर्यंत हे साखळी ठिय्या आंदोलन सुरूच राहिलं असा इशारा ओबीसी सेवा संघांचे सरचिटणीस राजू कुकडे व पीपल्स डेमाक्रेटिक पार्टीच्या जिल्हाध्यक्षा नभा वाघमारे यांनी दिला आहे.