वाघाच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू

🔸भद्रावती तालुक्यातील धानोली येथील घटना

✒️भद्रावती(Bhadrawati विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

भद्रावती(दि.26 डिसेंबर) :- शेतशिवारात चरत असलेल्या एका बैलावर एका वाघाने हल्ला करून त्याला ठार मारल्याची घटना भद्रावती तालुक्यातील धानोली येथील भुयारी रीठ शेत शिवारात दिनांक 26 ला घडली. यात बैल मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. धानोली येथील शेतकरी हनुमान जयराम विधाते यांचा बैल सकाळच्या वेळी गावालागत असलेल्या भुयारी रीठ शिवारात असलेल्या शेतात चरत असताना वाघाने त्या बैलावर हल्ला करून त्याला ठार मारले.

घटनेची माहिती भद्रावती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला. बैलाच्या शवविच्छेदनासाठी पशुवैद्यकीय अधिकारी गावात दाखल झाले. बैलाचा मृत्यू झाल्याबद्दल त्याची नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी विधाते यांनी केली आहे.