संकल्पपत्रा मुळे लोककल्याणकारी राज्याची वाटचाल वेगवान होईल…ना.श्री. सुधीर मुनगंटीवार

🔸केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ‘संकल्पपत्र’चे विमोचन

✒️मुंबई(Mumbai विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.11 नोव्हेंबर) :- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे जारी करण्यात आलेले ‘संकल्पपत्र’ हे महाराष्ट्राची प्रगती, विकास आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रजतेच्या राज्याच्या संकल्पनेची पूर्ती करणारे ‘व्हिजन डाक्यूमेंट’ आहे. या संकल्पपत्रामुळे महाराष्ट्राची विकसित व लोककल्याणकारी राज्याची वाटचाल वेगवान होईल. हे संकल्पपत्र हे राज्याच्या पुढच्या वाटचालीचे दृष्टीपत्र ठरणार आहे, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री आणि भाजपाच्या वचननामा समितीचे अध्यक्ष श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठीचे महाराष्ट्र भाजपाचे ‘संकल्पपत्र’चे रविवारी (ता.१०) केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाह यांच्या हस्ते मुंबईत विमोचन करण्यात आले. मंचावर उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री श्री पीयूष गोयल, राष्ट्रीय महासचिव श्री विनोद तावडे, केंद्रीय मंत्री श्री रावसाहेब दानवे, जाहिरनामा समितीचे संयोजक डॉ. विनय सहस्रबुद्धे, मुंबई भाजपा अध्यक्ष श्री आशिष शेलार उपस्थित होते.

‘संकल्पपत्रा’बद्दल माहिती देताना श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, जनतेच्या सहभागाने, जनतेकडून आलेल्या हजारो सूचनांचा विचार करून आणि १८ विषयवार उपसमित्यांच्या माध्यमातून हे ‘संकल्पपत्र’ निर्माण झाले आहे. संकल्पपत्राकरिता महाराष्ट्रातील ८७७ गावांमधून ई-मेल आणि पत्राद्वारे ८९३५ सूचना प्राप्त झाल्या. हे संकल्पपत्र केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न राहता निवडणुकी नंतर अंमलबजावणी करण्याचे दस्तावेज ठरणार आहे. एकेक मुद्द्यावर आधारित अंमलबजावणी समिती तयार करण्यात येणार असून यामध्ये देशातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवारांचा समावेश करण्यात येईल, असेही श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला गती मिळाली आहे, हे पटवून देताना श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी काही आकडेवारी सादर केली. ते म्हणाले, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून १ मे १९६० ते २०१४ पर्यंत राज्याचा जीएसडीपी १५ लक्ष ३७ हजार ३६६ कोटी होता. त्यात मागील दहा वर्षात वाढ होऊन तो ४०.४४ कोटी झाला. तर १ मे १९६० पासून २०१४ पर्यंत महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न १ लक्ष २५ हजार होते. ते आज २ लाख ७७ हजार रुपयांपर्यंत गेले आहे. महाविकास आघाडीच्या काळात इतिहासात पहिल्यांदा ६ हजार रुपयांनी दरडोई उत्पन्न खाली आले.

 महायुतीचे सरकार येणे ही महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. मागील ५४ वर्षात पायाभूत सुविधांमध्ये कधीही न झालेली विक्रमी वाढ झाली आहे. भारतीय जनता पार्टीच्या १० वर्षाच्या कार्यकाळात पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्ग करण्यात १० वर्षात १३ हजार ६०० किमीची वाढ झाली. महाराष्ट्राला ‘फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी’ करण्यासाठी ‘संकल्पपत्र’ अत्यंत महत्वाचे आहे. आज जगात ३६व्या क्रमांकावर असलेली भारताची अर्थव्यवस्था पहिल्या दहामध्ये आणण्यासाठी हे ‘संकल्पपत्र’ ‘व्हिजन डाक्यूमेंट’ ठरेल, असाही विश्वास श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.