बालसाहित्याला मनोरंजनाकडून माणूसपणाकडे नेणारा आशय लाभावा..एकनाथ आव्हाड, मुंबई

🔹कवितेच्या घरी राज्यस्तरीय बालसाहित्य संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.13 ऑक्टोबर) :- 

सध्याच्या धकाधकीच्या काळात बालमनावर योग्य संस्कार करणे आवश्यक आहे. त्यांच्यावर संस्कार करण्यासाठी उत्कृष्ठ दर्जाच्या बालसाहित्य निर्मितीची गरज आहे. परंतु इतर साहित्यलेखनाच्या तुलनेत सध्या बालसाहित्याचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. पुढची उत्तम पिढी घडवायची असेल, तर साहित्यिकांनी बालमनाची मानसिकता ओळखून मुलांचे मनोरंजन करतानाच त्यांच्यावर माणूसपणाचे संस्कार रूजविणारे साहित्यलेखन करायला हवे असे उद्गार साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त साहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी काढले. कवितेचे घर, शेगांव (बु.), त. वरोरा, जि. चंद्रपूर यांच्या वतीने शेगाव (बु.) येथे राज्यस्तरीय बालसाहित्य संमेलनाचे व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या राज्यस्तरीय संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रंथाली प्रकाशनचे विश्वस्त सुदेश हिंगलासपुरकर, सुप्रसिद्ध चित्रकार पुंडलिक वझे, कथाकथनकार सुमन नवलकर, प्रसिद्ध साहित्यिक डॉ. ज्योती कपिले, सुप्रसिद्ध हस्त कलाकार उमेश कदम मंचावर उपस्थित होते.

आव्हाड पुढे म्हणाले, सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे, अशा काळात मुलांच्या मनोरंजनासाठी अनेेक माध्यमे वापरली जातात. सध्याच्या टेक्नालॉजीच्या युगात मुलांवर त्याचे विपरित परिणाम होत आहेत. मुलांना योग्य पद्धतीने घडविण्यासाठी पुस्तकांपेक्षा दुसरा चांगला पर्याय नाही. पुस्तकातून बालकांची मने सुदृढ होतात. त्यांच्या मेंदूचा विकास होतो आणि तो पुढे जाऊन विचारक्षम बनतो. त्यामुळे पालकांनीही बालवयात मुलांवर योग्य संस्कार करण्याच्या दृष्टीने पुस्तकांचा आधार घ्यावा असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी सुदेश हिंगलासपुरकर यांनी ग्रंथालीच्या वतीने २०० कवितासंग्रहांचा संच कवितेच्या घराला भेट दिला. 

याप्रसंगी अतुलनीय सामाजिक योगदानाबद्दल शेगाव येथील प्रतिष्ठित व्यापारी व उद्योजक प्रकाश पद्मावार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच बापुरावजी पेटकर राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यामध्ये विजय जोशी (विजा, डोंबिवली), मंदा नांदुरकर (अचलपूर), प्रतिभा जगदाळे (सांगली), गणेश भाकरे (सावनेर) या पुरस्कार विजेत्यांचा शाल, सन्मानपत्र, सन्माचिन्ह, पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या संमेलनात कौसल्याबाई बापुराव पेटकर लिखित ‘कौसल्यायन’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक अष्टगंध प्रकाशन, मुंबई यांनी प्रकाशित केले आहे. संमेलनाप्रसंगी सुदेश हिंगलासपुरकर, सुमन नवलकर व उमेश कदम यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवितेच्या घराचे संस्थापक श्रीकांत पेटकर यांनी केले. प्रकाश पद्मावार यांच्या मानपत्राचे वाचन विनोद चिकटे यांनी केले. ह्या प्रसंगी राज्य सेवा आयोगातर्फे निवड झालेल्या करिश्मा निखारे यांचा सुद्धा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. संमेलनाच्या पहिल्या सत्राचे संचालन कवितेच्या घराचे कार्यवाह डॉ. प्रमोद नारायणे यांनी, तर आभार संकल्पनाकार किशोर पेटकर यांनी मानले.

संमेलनाप्रसंगी सुरूवातीला काव्यदिंडीचे आयोजन करण्यात आले. या काव्यदिंडीत जि.प. प्राथमिक शाळा, शेगांव ( बु. ), जि. प. उच्च प्राथमिक शाळा, खेमजई, जिल्हा. प. उच्च प्राथमिक शाळा, चंदनखेडा येथील विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यानंतर ‘कवितेवर बोलू काही’ या सदरात मुुंबईच्या प्रसिद्ध साहित्यिक ज्योती कपिले यांची मुलाखत बदलापूरचे सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. संदीप भेले यांनी घेतली. कपिले यांनी अनेक बालकवितांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. तसेच  विद्यार्थ्यांना काव्यकोडी विचारून त्यांना सहभागी करून घेतले. दुसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध चित्रकार डॉ. पुंडलिक वझे यांनी कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चित्र काढण्याच्या सोप्या सोप्या क्लृप्त्या शिकविल्या.

चित्रांच्या वेगवेगळ्या प्रकारांची माहिती प्रात्यक्षिकांच्या आधारे देऊन कार्यशाळेत रंगत आणली. सुप्रसिद्ध हस्त कलाकार उमेश कदम यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे ओरिगामी या  हस्त प्रकारातील कागदापासून विविध वस्तू तयार करायला शिकविले. त्यानंतर विजय जोशी यांच्या अध्यक्षतेखाली बालकाव्यमैफल पार पडली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कवी पंडित लोंढे, अॅड. अरविंद पेटकर उपस्थित होते. या काव्यमैफलीत जि. प. शाळा, खेमजई व जि. प. शाळा, चंदनखेडा येथील ३० विद्यार्थ्यांनी विविध विषयावर दर्जेदार कविता सादर केल्या. त्यानंतर कवी नरेशकुमार बोरीकर, गोपाल शिरपूरकर, राजरत्न पेटकर यांनीही कविता सादर केल्या. संमेलनात निखिल आत्राम यांची चित्र प्रदर्शनी लावण्यात आली होती. संपूर्ण संमेलनाचे आभार कार्यक्रम प्रमुख डॉ. संदीप भेले यांनी मानले. याप्रसंगी रामभाऊ पेटकर, प्रा. कीर्तीलता पेटकर प्रामुख्याने उपस्थित होते.

या संमेेलनाच्या यशस्वितेसाठी प्रसिद्धी प्रमुख सूर्यकांत पाटील, भारत रामटेके, रंजना रामटेके, डॉ. मृणाली पेटकर,शिक्षक ईश्वर टापरे, सहायक शिक्षिका ज्योत्स्ना मेश्राम, सविता बगडे, शिक्षक गजानन नवघरे, रोशन हजारे, राजू मांडवकर, विकास जवादे, नितीन वैद्य, प्रा. भालचंद्र लोडे, प्रा. अर्चना लोडे, अमोल दातारकर, आशिष धकाते, प्रेमसागर पाटील, त्रिशूल निखारे इत्यादीनी सहकार्य केले.