🔸मनसेचा उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनातून प्रशासनाला इशारा
✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि.20 सप्टेंबर) :- वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज सन्मान शेतकरी कर्जमाफी पासून वंचित हजारो शेतकऱ्यांची त्वरित कर्जमाफीकरावी, 2023 च्या खरीप व रब्बी पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बैंक खात्यामध्ये टाकावी व स्थानिक कंपन्यात मराठी तरुणांना नौकरीत प्रथम प्राधान्य द्यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे खळखट्याक आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे उपविभागीय कार्यालय वरोरा येथे झालेल्या ठिय्या आंदोलनातून मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी राज्य शासन व स्थानिक प्रशासनाला दिला आहे. या ठिय्या आंदोलनात वरोरा तालुक्यातील शेकडो शेतकरी सामील झाले होते.
वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील हजारो शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेपासून वंचित आहे त्यांना सरकारने जाहीर केल्यानंतर सुद्धा कर्जमाफी झाली नाही, मागील वर्षी 2023 च्या सोयाबीन आणि कापूस चना या उत्पादक शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात 31 ऑगस्ट पर्यंत पीक विम्याची रक्कम टाकण्यात येईल अशी घोषणा करून देखील अजूनपर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाही, या विधानसभा क्षेत्रातील वर्धा पॉवर, जिएमआर पॉवर, सनफ्लॅग एकोना कोळसा खान, कर्नाटका, अरविंदो कोळसा खान या कंपन्यामध्ये परप्रांतीय मोठ्या प्रमाणात असल्याने तिथे मराठी बेरोजगार युवकांना रोजगार देण्यात यावा या मागण्या घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वेळीवेळी शासन प्रशासनाकडे पाठपुरावा करून आंदोलन करण्यात येत आहे.
परंतु सरकारने कर्जमाफी व पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्याबाबत घोषणा करून सुद्धा शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही पीक विम्याचे पैसे मिळाले नाही आणि स्थानिक कंपन्यात मराठी बेरोजगार युवक यांना कामावर घेतले नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून शासन प्रशासनाला इशारा दिला की येत्या दहा दिवसात आंदोलनात निवेदनाद्वारे केलेल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मनसे तर्फे खळखट्याक आंदोलन करण्यात येईल व या दरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडल्यास स्वतः प्रशासन जबाबदार असेल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यात सततची नापिकी व कर्जाचा वाढता भार असह्य झाल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढल्या असल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून तत्कालीन फडणवीस सरकारने २८ जून २०१७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली होती, दरम्यान वरोरा भद्रावती या क्षेत्रातील जवळपास 15 हजार शेतकरी या कर्जमाफी योजनतेतून पात्र असतांना सुद्धा ते या कर्जमाफी पासून प्रशासनाच्या तांत्रिक अडचणीमुळे वंचित राहिले होते व राज्यात जवळपास 6 लाखापेक्षा जास्त शेतकरी वंचित राहिले होते.
या संदर्भात शिंदे सरकारने मागील अधिवेशनात या योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशी घोषणा करून तालुका स्तरावरील सहाय्यक निबंधक यांना या संदर्भात याद्या तयार करण्याचे निर्देश दिले होते, परंतु आजपर्यंत यावर अंमलबजावणी करण्यात आली नाही, शिवाय मागील वर्षीच्या (2023) पीक विम्याचे जवळपास 60.00 टक्के पात्र शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही, दरम्यान ते पैसे त्वरित शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात टाकावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शासन प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु आहे, पण तारखावर तारखा विमा कंपनीच्या एजंट द्वारे देण्यात येत आहे.
त्यामुळं यावर त्वरित तोडगा काढून पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे देण्यात यावे अन्यथा मनसे तर्फे विमा कंपनीचे कार्यालय निशाण्यावर असेल असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी प्रशासनला दिला आहे, यावेळी मनसे शेतकरी सेना जिल्हा उपाध्यक्ष मोहित हिवरकर, तालुका उपाध्यक्ष किशोर धोटे, विभाग अध्यक्ष राजेंद्र धाबेकर, शहर सरचिटणीस प्रतीक मुडे, बाळू गेडाम, शेतकरी सेना पदाधिकारी भदूजी गारघाटे, सुधाकर ठाकरे, प्रमोद हनवते, रंगनाथ पवार, उत्तम चिंचोलकर व इतर महाराष्ट्र सैनिक व शेतकरी उपस्थित होते.