श्री सिद्धेश्वर मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा १९ ऑगस्टला

🔹अयोध्‍या येथील श्रीराम मंदिर समितीचे कोषाध्‍यक्ष श्री. स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांच्या हस्ते होणार प्राणप्रतिष्ठा

🔸सौ. सपना व ना. श्री. सुधीर मुनगंटीवार भूषविणार यजमानपद

✒️ संजय तिवारी चंद्रपूर जिल्हा (Chandrapur प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.15 ऑगस्ट) :- श्री कन्यका माता मंदिर ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या सोमवारी (दि. १९ ऑगस्ट) आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य तसेच मत्स्यव्यवसाय मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार सपत्नीक प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे यजमानपद भूषविणार आहेत. तर अयोध्या येथील श्रीराम मंदिर समितीचे कोषाध्यक्ष श्री स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होईल.

श्री सिध्देश्वर मंदिर, श्री गणेश, माता पार्वती, हनुमानजी, नागदेवता यासर्व देवांच्‍या मुर्तीचे नवनिर्माण कार्य पुर्णत्वास आले आहे. या मंदिरात श्री सिध्देश्वर महादेव, श्री साईबाबा आणि श्री गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. १९ ऑगस्टला दुपारी २ वाजून ३ मिनीट ते २ वाजून ११ मिनीटे या शुभमुहूर्तावर विधिवत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ पासून महाप्रसादाचे वितरण होईल. या संपूर्ण उत्सवात सौ. सपना व श्री. सुधीर मुनगंटीवार, डॉ. सौ. शलाका व डॉ. श्री. तन्मय बिडवई तसेच कु. शुरवी बिडवई यांचा सहभाग असणार आहे.

श्री स्वामी गोविंद देव गिरी महाराजांचे प्रवचन

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर श्रीराम मंदिर समितीचे कोषाध्यक्ष श्री स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. १९ अॉगस्टला दुपारी ३ वाजता श्री कन्यका परमेश्वरी देवस्थानात महाराजांचे प्रवचन होईल. या प्रवचनाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सौ. सपना व श्री.सुधीर मुनगंटीवार आणि समस्त मुनगंटीवार परिवार व कन्यका मंदिर देवस्थान ट्रस्ट, चंद्रपूरच्या वतीने करण्यात आले आहे.