भद्रावती तालुक्यातील वाघेडा गावातील रस्ते, नाल्या व पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर

🔹प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सरपंच व ग्रामस्थांनी केली रस्त्यावरच्या चिखलात धानाच्या रोपांची रोवणी

✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadrwati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.14 ऑगस्ट) :- तालुक्यातील वाघेडा गावातील सार्वजनिक रस्ते, नाल्या व पिण्याच्या पाण्याची समस्या अत्यंत गंभीर आहे. दि. १५ ऑगस्ट रोजी गावात स्वातंत्र्यदिन साजरा करायचा असल्यामुळे चिखलाने माखलेले गावातील रस्ते साफ करतांना ह्या समस्येकडे शासन, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. १३ ऑगस्ट रोज मंगळवार रोजी तीन वाजताचे सुमारात सरपंच सुरेश तराळे व ग्रामस्थांनी चक्क रस्त्यावर साचलेल्या चिखलातच धानाच्या रोपांची रोवणी केली.

      भद्रावती शहराच्या उत्तरेस १४ कि.मी. अंतरावर वाघेडा गाव आहे. सदर गाव गटग्रामपंचायत वाघेडा -शेलोटी अंतर्गत येते. या ग्रा.पं. मध्ये वाघेडा आणि धामनी ह्या दोन गावांचा समावेश आहे. वाघेडा गावाची लोकसंख्या सुमारे सातशे आहे. वाघेडा गावातून जाणारा सागरा – पिर्ली हा मुख्य रस्ता आणि इतर पाच – सहा अंतर्गत मार्ग आहे. दहा ते पंधरा वर्षापुर्वी गावातील मार्गाचे बांधकाम करण्यात आले होते. परंतु सध्या मात्र गावातील सर्वच मार्गाची अवस्था दैयनिय झाली आहे. गावात सार्वजनिक नाल्याचा पत्ता नाही. यामुळे येथील रस्त्यावरुन बारमाही सांडपाणी वाहात राहते. पाऊसाळ्यात तर रस्त्यावर चिखलाचे साम्राज्यच असते.

    वाघेडा ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार येथील नळ योजना सुध्दा सदोष असल्याचे समजते. आमचा गाव दत्तक घ्या. गावातील रस्ते, नाल्या व पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवा. अशी मागणी वाघेडा ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे वारंवार केली .परंतु समस्या सुटली नाही. यामुळे वाघेडा ग्रामस्थ त्रस्त झाले आहे.वाघेडा गावातील रस्ते, नाल्या व पिण्याची समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष द्यावे. अशी मागणी वाघेडाचे सरपंच सुरेश तराळे व भद्रावतीचे युवा सामाजिक कार्यकर्ते सुरज खंगार यांनी संयुक्तपणे केली आहे.