मोदी आवास योजना : चंद्रपूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यात उर्वरित रक्कम जमा करा

🔸ना. सुधीर मुनगंटीवार यांचे मंत्री अतुल सावेंना पत्र

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.18 जुलै) :- ग्रामीण भागातील बेघरांना विशेषतः मागास प्रवर्गात व विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वतःचे पक्के घर मिळावे यासाठी सुरू असलेल्या मोदी आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात उर्वरित रक्कम तातडीने संबंधित खात्यात जमा करावी अशी विनंती जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री ना. श्री. अतुल सावे यांना पत्राद्वारे केली आहे.

मोदी आवास योजनेअंतर्गत सर्वांसाठी घरे -२०२४ या राज्य शासनाच्या धोरणाखाली इतर मागास प्रवर्गातील व विशेष मागास प्रवर्गातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे पक्के घर मिळावे यासाठी ग्रामीण भागातील बेघरांना उपरोक्त योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करण्यात येते. चंद्रपूर जिल्ह्यासाठी सन २०२३-२४ अंतर्गत जानेवारी २०२४ मध्ये सदर योजनेअंतर्गत इतर मागास प्रवर्गासाठी १०७४६ व विशेष मागास प्रवर्गासाठी १२८ घरकुले मंजूर करण्यात आली.

 डोंगराळ/ दुर्गम भाग क्षेत्रामध्ये घरकुल बांधकामाकरिता प्रती घरकुल एक लक्ष 30 हजार रुपये व सर्वसाधारण क्षेत्राकरिता एक लक्ष 20 हजार रुपये अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. फेब्रुवारी 2024 मध्ये घरकुल बांधकामाचा पहिला हप्ता 20 हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला असून, उर्वरित अर्थसहाय्य अद्याप पर्यंत न मिळाल्यामुळे घरकुल बांधकाम पूर्ण करण्यास अडचण निर्माण होत आहे याकडे ना. मुनगंटीवार यांनी ना. अतुल सावे यांचे लक्ष वेधले आहे.

 त्या अनुषंगाने घरकुलाचे उर्वरित हप्त्याची रक्कम स्टेट नोडल अकाउंट मध्ये जमा करण्यासाठी संबंधितांना आदेश देण्याची विनंती ना. सुधीर मुनगंटीवार यांनी इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री श्री. अतुल सावे यांना निवेदनाद्वारे केली आहे.