वरोरा उड्डाण पुलावर पुन्हा एक अपघात..मोठा अनर्थ टळला

✒️शिरीष उगे वरोरा(Warora प्रतिनिधी)

वरोरा(दि.16 जुलै) :- येथे उड्डाण पुलावर 14 जुलै रोज रविवारला पुन्हा एक अपघात थोडक्यात होता होता वाचला. परंतु या प्रकरणात शहरातील प्रसिद्ध व्यवसाय व्यवसायिक यांच्या कारचे बरेच नुकसान झाले.

       या उड्डाण पुलावर एका दिवसापूर्वीच अपघात होऊन त्यात दोन लहान मुलांसोबत सह एकूण चार जण जखमी झाले होते. वरोरा शहरातील व्यवसायिक सादिक अली व त्यांचे बंधू माजी नगराध्यक्ष व प्रदेश भाजप अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष अहेतेशाम अली यांना आलिशान मंगल कार्यालयातून घेण्यासाठी त्यांचा चालक होंडा सिटी कंपनीची कार क्रमांक एम एच 49 यु 5555 ने 14 जुलै रोज रविवारला रात्री साडेदहाच्या सुमारास जात होता. त्यावेळी टोल नाक्यावर एम एच 40 एन 6670 क्रमांकाचा 20 चाकांचा हायवा उभा होता. या हायवा ट्रक वेकोलीच्या एकोना खाणीतून कोळसा भरून वणीला जात होता. त्यामुळे त्या हायवाच्या मागे ही कार जाऊन उभी राहिली. परंतु हायवा चालकाने अचानक आपला हायवा वेगाने मागे आणला. त्यामुळे कारच्या समोरील भाग क्षतीग्रस्त झाला व त्यामुळे कारचे बरेच नुकसान झाले.

     सदर हायवा हा चंद्रपूर येथील वहाज अली शेख यांच्या मालकीचा असून मारेगाव येथील राजू खिरटकर हा तो चालवत होता. 

         वरोरा शहरातून कोळशाची अवैधपणे वाहतूक होत नसल्याचे वेकोली प्रशासन सांगत असून शासकीय प्रशासनाने ही वाहतूक शहरातून होऊ नये यासाठी बंधन घातलेले आहे. असे असले तरी शहरातील मुख्य रस्त्यावरून कोळशाची अवैधपणे वाहतूक राजरोसपणे सुरू असते.यावर मात्र कोणाचेही बंधन नसल्याचे या घटनेने स्पष्ट झाले आहे.

     कारचालक अजर खान याने योग्य काळजी घेतल्याने पुढील अनर्थ टाळला. अन्यथा वेगळेच अघटित घडले असते.

 या निमित्याने शहरातून होणारी कोळशाची अवैध वाहतूक बंद करण्यासाठी पोलीस व महसूल प्रशासनाने योग्य कारवाई करणे आवश्यक आहे.

हायवा चालकाने सदर ट्रक एका पोलिसाचा असल्याचे अगोदर सांगितले होते. परंतु काही वेळाने त्याने यात सुधारणा केली. त्यामुळे या अवैध व्यवसायात पोलिसांचे काही लागेबंधे तर नाही ना अशी शंका घेण्यास हरकत नाही.