दोन महिन्यात काम पूर्ण करून बाबूपेठ उड्डाण पुल नागरिकांच्या सेवेत रुजू करा – आ. किशोर जोरगेवार

🔹मनपा प्रशासनाला सूचना, उर्वरित निधी लवकरच उपलब्ध करून देणार

✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपूर (दि.10 जुलै) :- निवडणून आल्यावर काही प्राथमिक कामांच्या यादीत बाबूपेठ उड्डाण पुलाचे काम होते. या पूलाचे काम जलद गतीने पूर्ण व्हावे यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा राहिला. रेल्वे विभागातर्फे पुलाच्या तिसऱ्या भागाचे काम सुरू होते. त्यामुळे कामात विलंब झाला, मात्र आता हे काम दोन महिन्यात पूर्ण करून सदर पूल नागरिकांच्या सेवेत रुजू करा, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे.

   महानगर पालिका अंतर्गत येणाऱ्या विविध विषयांना घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनासह बैठक घेतली. यावेळी सदर उड्डाण पूलाच्या कामासाठी लागणारा ५ कोटी रुपयांचा निधी आपण उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले असून पुलाचे काम दोन महिन्याच्या आत सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत.

या बैठकीला मनपा अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त रविंद्र भेलावे, सहाय्यक आयुक्त सचिन माकोडे, नरेंद्र बोबाटे, अमूल भुते, अमोल शडके, अमित घुले, शहर अभियंता विजय बोरिकर, रविंद्र हजारे, डॉ. नयना उत्तरवार, राहुल पंचबुद्धे, रविंद्र कांबळे, रफिक शेख, सारिखा शिरभाते, राहुल भोयर, आशिष भारती आदींची उपस्थिती होती.

     बाबूपेठ रेल्वे रुळ हा येथील नागरिकांसाठी मोठी समस्या आहे. येथे उड्डाण पूल तयार करण्यात यावा, अशी येथील नागरिकांची जुनी मागणी आहे. आपण निवडून आल्यावर या प्रस्तावित कामाला गती देण्याचे काम केले. मध्यंतर निधी अभावी काम रखडले होते. यासाठी पाठपुरावा केला. नंतर रेल्वे पुलाच्या कामाला गती मिळाली होती.

मात्र रेल्वे विभागाअंतर्गत पुलाच्या तिसऱ्या भागाच्या कामामुळे विलंब झाला. मात्र आता हे काम पूर्ण झाले आहे. केवळ पालिका अंतर्गत करण्यात येणारी कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे आपण ही कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत. यासाठी लागणारा ५ कोटी रुपयांचा निधी तात्काळ मिळवून देणार असल्याचेही आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.