विसापुर’चे सरपंच, उपसरपंच पायउतार होणार

🔹ग्रामीण राजकीय वर्तुळात खळबळ ; १४ सदस्यांकडून तहसीलदारांकडे अविश्वास ठराव दाखल

✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी) 

चंद्रपूर (दि.8 जून) :- लोकसंख्येच्या दृष्टीने विसापूर ग्रामपंचायत तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. त्या मानाने तिथल्या समस्याही मोठ्या आहे. मात्र, लोकहिताच्या या समस्यांकडे सरपंच,उपसरपंच कानाडोळा करीत असून ग्रामपंचायतीत भोंगळ कारभार सुरू असल्याची ओरड ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांकडून सुरू होती.

अखेर शुक्रवार (दि.०७ जून रोजी) हा भोंगळ कारभार प्रत्यक्षात कागदावर उतरला असून विसापूर ग्रामपंचायतीच्या १७ सदस्यांपैकी तब्बल १४ सदस्यांनी तहसीलदार बल्लारपूर यांच्याकडे सरपंच वर्षा कुळमिथे, उपसरपंच अनकेश्र्वर मेश्राम यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला. सत्ताधाऱ्यांनी आपल्याच सरपंच, उपसरपंच यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केल्याने.गावात विविध चर्चेला उधाण आले आहेत. 

       बल्लारपूर तालुक्यात विसापूर सर्वात मोठे गाव असून लोकसंख्या १७ हजारावर आहे. येथील ग्रामपंचायत सदस्य संख्या १७ असून मागील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीचे ११ सदस्य, तर काँग्रेस-२,भाजप – २, शिवसेना-२, असे १७ सदस्य निवडून आले होते.

सरपंच पद अनुसूचित जमाती महिला राखीव असल्याने सरपंच पदी वर्षा कुळमेथे तर उपसरपंच पदावर अनेकश्वर मेश्राम यांची निवड करण्यात आली होती. मात्र, सरपंच महिला व त्यातच नवख्या असल्याने ग्रामपंचायतीचा सर्व कारभार उपसरपंच अनेकश्वर मेश्राम हेच चालवीत होते. याच काळात गावात पाणी टंचाई, स्वच्छ्ता, भूमिगत कोळसा खाण प्रकरण अश्या विविध समस्या निर्माण झाल्या असून त्या आजरोजी कायम आहे. या लोकहिताच्या समस्या विरोधात गावकऱ्यांनी अनेकदा आंदोलने केले. मात्र, सरपंच, उपसरपंच यांनी या सर्व समस्यांकडे कानाडोळा केल्याने स्वपक्षीय सदस्यांनी हतबल झाले होते.

त्यांनी अनेकदा नाराजी बोलून दाखविली मात्र, त्याकडे कानाडोळा केल्याने अखेरकार गावकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेता स्वपक्षीय ११ सदस्य, ईतर – ३ अश्या १४ सदस्यांनी सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच पदावर अनेकश्वर मेश्राम यांच्या विरोधात मा.तहसीलदार बल्लारपूर यांच्याकडे शुक्रवार (दि.०८ जून रोजी) अविश्वास ठराव दाखल केला. या अविश्वास ठरावावर १४ जून रोजी विसापूर ग्रामपंचायत सदस्यांची मा. तहसीलदार यांनी विशेषसभा बोलावण्यात आली असून या सभेत या अविश्वास ठरावावर निर्णय घेण्यात येणार आहे. 

त्यामुळे येत्या सात दिवसात विसापूर गावात काय राजकीय घडामोडी घडतात याकडे गावाकऱ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे विसापूर ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच सरपंच व उपसरपंच यांच्यावर स्वपक्षीय सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल झाला आहे.

प्रतिक्रिया,

प्रियदर्शनी बोरकर मा.तहसीलदार बल्लारपूर.

विसापूर ग्रामपंचायतीचे १४ सदस्यांनी माझ्या समक्ष सरपंच व उपसरपंच यांचवरील अविश्वासाचा प्रस्ताव स्वाक्षरीसह सादर केला आहे. या प्रस्तावानुसार १४ जून रोजी विसापूर ग्रामपंचायत सदस्यांची विशेषसभा बोलावून अविश्वास ठरावावर निवडणूक घेऊन निर्णय घेण्यात येईल.