दारू विक्री संदर्भात अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करा

🔹जिल्हाधिकाऱ्यांचे दारू दुकानदार व बारमालकांना सक्त निर्देश

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.26 मे) :- पुणे येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात दारू विक्री व परवानाबाबत जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून दारू विक्री संदर्भात सर्व अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करावे. अन्यथा सक्त कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दुकानदार व बारमालकांना दिला आहे.

एफएल -3 अनुद्यप्तीधारकांनी कुठल्याही संबंधित किरकोळ मद्य विक्री अबकारी अनुद्यप्तीतून 21 वर्षाखालील व्यक्तीस मद्य विक्री करू नये. तसेच 21 ते 25 वर्ष वयोगटात असलेल्या व्यक्तीस सौम्य बियर /सौम्य मद्य विक्री करावी. 25 वर्षापेक्षा कमी वयोगटात असलेल्या व्यक्तीस तीव्र मद्य देऊ नये.   

अनुद्यप्तीच्या वेळेचे काटेकोरपणे पालन करावे. चंद्रपूर जिल्ह्यातील अनुद्यप्ती सकाळी 11.30 ते रात्री 11.30 या वेळेतच सुरू राहील, याची दक्षता घ्यावी. 

मद्य सेवन करणाऱ्या व्यक्ती जवळ मद्य सेवनाचा परवाना असणे आवश्यक आहे. अनुद्यप्तीच्या जागेत कोणत्याही असमाजिक तत्व / गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती आढळल्यास त्याबाबत त्वरित पोलीस विभागाला कळवावे.

अनुद्यप्तीच्या परिसरात येणाऱ्या व जाणाऱ्या ग्राहकांच्या हालचालीवर नजर ठेवण्याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे. मंजूर जागेच्या क्षमतेपेक्षा जास्त व्यक्तींना अनुद्यप्तीच्या ठिकाणी प्रवेश देऊ नये.

परवाना कक्ष अनुद्यप्ती कामकाजाच्या वेळेबाबतचा फलक आस्थापनेच्या आत दर्शनी भागात लावावा. वरील सर्व बाबींचे अतिशय काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा सक्त कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहे.