✒️जगदीश पेंदाम वरोरा(Warora विशेष प्रतिनिधी)
वरोरा (दि.28 नोव्हेंबर) :- आदिवासी हा या देशाचा मूळ निवासी आहे. वनवासी नाही. आदिवासीना भारतीय घटनेने ” अनुसूचित जमाती ” म्हणून आरक्षणाचे अधिकार दिलेत. मात्र महाराष्ट्र राज्याच्या स्थापने पासून खऱ्या आदिवासीवर अन्यायचं होत गेला. खऱ्या आदिवासीना खऱ्या अर्थाने आरक्षणाचे हक्क मिळालेच नाहीत.
प्रारंभीच्या काळात क्षेत्रबंधानामुळे व नंतरच्या काळात बोगस आदिवासीमुळे खऱ्या आदिवासीचे अतोनात नुकसान झाले. शिक्षणतील आणि नोकरीतील लक्षावधी जागा जातीच्या खोट्या प्रमाणापत्राच्या आधारे बोगस आदिवासीनी बळकावून घेतल्या. खऱ्या आदिवासी समाजाला न्याय मिळावा म्हणून वेळोवेळी आंदोलन केलीत.
कोर्ट -कचेऱ्या झाल्यात. परिणामी अनु. जमाती प्रमाणपत्र पडताळणी कमिटयांची स्थापना करण्यात आली.त्यामुळे आता खऱ्या आदिवासीना न्याय मिळणार असे वारे समाजात वाहू लागले. परंतु दि.15/06/1995 चा जी. आर. आणि आता दि.21/10/2015च्या शा. प. मुळे खऱ्या आदिवासीच्या आशा, अपेक्षा पार धुळीस मिळाल्या. राज्यातील सरकार बदलले, परंतु सरकारचे आदिवासी -विरोधी धोरण बदलले नाही.
एन. टी. मध्ये असलेल्या धनगर आणि हलबा कोष्टी व इतर गैरआदिवासी जातींना आदिवासीचे आरक्षण मिळावे म्हणून सरकारचे प्रयत्न सुरूच आहेत. शिवाय अनुसूचित जमातीच्या यादीतील 17 जमातीचे सर्वेक्षणही सुरु करणार आहे.म्हणजे काही जमातीना आदिवासीच्या यादीमधून वगळणे आणि नव्या जमातीना आदिवासीमध्ये घुसविणे असा सरकारचा कुटील डाव आहे बोगस आदिवासीना पाठीशी घालने म्हणजे खऱ्या आदिवासीच्या पाठीत खंबीर खुपसणे होय.
आणि खऱ्या आदिवासीच्या आरक्षणावर गदा आणणाऱ्या महायुतीच्या सरकार विरुद्ध गोंडियन आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती वरोराच्या वतीने दि.04/12/2023 रोज सोमवार ला सकाळी 11.00 वाजता. जैयतूर पेणठाणा रेल्वेउडान पुलाजवडून निघणार असून या महामोर्चाचे मार्गदर्शक निरंजनभाऊ मसराम,मधुकरभाऊ उईके, मनोजभाऊ आत्राम, डॉ. प्रवीण येरमे, गोंडराजे विरेंद्ररशहा आत्राम, मनोजसिहं मडावी गोंड, चिंतामन आत्राम, पुष्पाताई आत्राम, गजानन जुमनाके.
महामोर्चाचे मार्गक्रमण जैयतूर पेणठाणा उडानपुला जवडून- साई मंगल कार्यालय -खापने दवाखाना – कामगार चौक – आंबेडकर चौक -राणी दुर्गावती चौक -उपविभागीय कार्यालय, वरोरा.खऱ्या गोंडियन आदिवासीचा हक्क संघर्ष भव्य निषेध महामोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे. तरी वरोरा -भद्रावती तालुक्यातील आदिवासी समाज बांधवानी हजारोच्या संख्येने भव्य निषेध महामोर्चाला उपस्थितीत राहावे असे आवाहन गोंडीयन आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती, वरोरा तर्फे करण्यात आले आहे.