✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)
भद्रावती (दि.22 ऑगस्ट) :- तालुक्यातील बेलगाव ते आष्टी या पांदन रस्त्याची अवस्था खूपच दयनीय आहे. या रस्त्याची लांबी जवळपास ५ ते ६ किलोमीटर असून या रस्त्याचे खडीकरण झालेले आहे. मात्र बेलगाव ते आष्टी पर्यंत जवळपास दीड किलोमीटर रस्ता संपूर्ण चिखलमय आहे. आणि या रस्त्यावरील तीन पुल सुद्धा तुटलेले आहे.
बेलगाव गावातील ग्रामस्थांना याच रस्त्यांनी शेतावर जावे लागते जवळपास ८० टक्के बेलगाव ग्रामस्थ याच रस्त्याने शेतामध्ये ये-जा करीत असतात व आवश्यक कृषी विषयक साहित्य देखील याच पांधन रस्त्याने नेत असतात. परंतु या रस्त्याची अवस्था पूर्णपणे चिखलमय झाल्यामुळे नागरिकांना नाहक शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्यासाठी शिवसेना (उबाठा) भद्रावती तालुकाप्रमुख तथा नगरसेवक नंदू पढाल यांच्या नेतृत्वात तसेच शिवसेना शहरप्रमुख घनश्याम आस्वले , युवासेना तालुकाप्रमुख राहुल मालेकर, यांच्या उपस्थितीत उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली. याप्रसंगी साहिल टोंगे, दिलीप टोंगे, सुधाकर टोंगे माजी ग्रामपंचायत सदस्य, प्रवीण वाबीटकर, अनुप डाखरे, प्रफुल भागवत, विनायक मालेकर, प्रफुल टोंगे, घनश्याम काकडे, अनिल भुसारी, सिकंदर टोंगे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.