▫️पहिल्याच पुराने चार इंच खाली पूल खसकल्याने निकृष्ठ दर्जाचे बांधकाम करणाऱ्या अग्रवाल कंपनीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची भाजपची मागणी(BJP demands a high-level inquiry into Agarwal Company for shoddy construction as the bridge fell four inches in the first flood)
✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.29 जुलै) :- माजरी – वरोरा-वणी महामार्ग बांधकाम करण्याचे कंत्राट ज्या अग्रवाल कंपनीला देण्यात आले त्या कंपनीने वर्धा नदीवरील पाटाळा गावाजवळील पुलाचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे केल्याने तो पूल जवळपास चार इंच खाली आला आहे व त्यामुळं कंपनीचे लोक आता त्यांवर तात्पुरती डागडुजी करून जणू काहीही झाले नसल्याची बतावणी करत आहे, परंतु भविष्यात तो पूल किती दिवस टिकेल याबद्दल संशय आहे.
खरं तर पूल बांधकाम करतांना ज्या तांत्रिक चाचण्या करायला हव्या त्या केल्याच्या व त्यांवर वरिष्ठांनी तपासल्याची माहिती नाही, हे बांधकाम करतांना मोठ्या प्रमाणात भरणा म्हणून फ्लाय ऐश वापरण्यात आली व सिमेंट लोहा यांचे प्रमाण सुद्धा वर्क आर्डर नुसार नसल्याने हा महामार्ग पूर्णता भ्रष्टाचाराने पोखरला असल्याने यावर उच्चस्तरीय चौकशी करा अशी मागणी भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष उमेश बोडेकर यांनी जिल्हाधिकारी, यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर व राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळ यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
एकीकडे पुलाचे काम वर्क आर्डर नुसार व्यवस्थित झाले नसतांना व अजून काही काम बाकी असतांना टोल नाका मात्र सुरू करून या महामार्गावर टोल वसुली सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या दहा दिवसात या पुलाच्या संदर्भात निर्णय घेऊन कंत्राटदार यांच्यावर कारवाई करावी अन्यथा पाटाळा परिसरातील सर्व जनतेला एकत्र करून अग्रवाल कंपनी विरोधात मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा उमेश बोडेकर यांनी प्रशासनाला दिला आहे.