🔹सार्वजनिक पार्किंगच्या जागेवर अतिक्रमण करून जनसंपर्क कार्यालय थाटले. पतसंस्थेचे कार्यालय पण बेकायदेशीर
✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर (दि .20 एप्रिल) :-
नागपूर विभागात शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत नुकतेच निवडून आलेले सुधाकर अडबाले यांनी चंद्रपूर शहारातील श्रीकृष्ण कॉलनी जगन्नाथ नगर येथील ज्ञानगंगा डुप्लेक्सच्या सार्वजनिक पार्किंगच्या जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण करून तिथे जनसंपर्क कार्यालय थाटले आहे.
शिवाय ते शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी पत संस्थेचे अध्यक्ष आहे व त्यांनी त्या पतसंस्थेचे कार्यालय याच ज्ञानगंगा डुप्लेक्स क्रमांक 2 मध्ये ठेवले आहे जेंव्हा की या इमारतीचे चार डुप्लेक्स हे रहिवासी वापराकरिता असताना तिथे पत संस्थेचे कार्यालय उघडून त्यांच्याकडून उघडपणे वाणिज्य वापर सुरु आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या विधानपरिषद सदस्य सुधाकर अडबाले यांची आमदारकी रद्द करा अशी मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी विधानपरिषद अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांच्याकडे केली आहे.
ज्ञानगंगा डुप्लेक्स क्रमांक 3 चे रहिवासी सौ. रुपाली रवींद्र जेणेकर यांनी स्थानिक महानगरपालिका चंद्रपूर येथे अनेकवेळा तक्रारी दाखल केल्या व सतत पाठपुरावा करून सुधाकर अडबाले यांचे अतिक्रमण काढून आम्हांला न्याय द्यावा अशी मागणी त्यांच्याकडून होतं आहे, मात्र येथील चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने केवळ सुधाकर अडबाले यांना दिनांक 11/11/2019, 12/11/2020 व 19/4/2021 ला पत्र देऊन मंजूर बांधकाम व्यतिरिक्त केलेले अतिक्रमण व बांधकाम सात दिवसाच्या आत काढण्याचा आदेश दिला आहे.
परंतु या तक्रारीला जवळपास पाच वर्ष होतं असताना महानगरपालिका प्रशासनाने हे बेकायदेशीर बांधकाम तोडले नाही उलट पार्किंग च्या जागेवर आता पक्के बांधकाम करून जनसंपर्क कार्यालय थाटले आहे. अध्यक्ष असलेल्या त्यांच्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी पत संस्थेचे कार्यालय बेकायदेशीर आहे, कारण ते रहिवासी परिसरात आहे आणि त्यांच्या नोंदणी प्रमाणपत्रात केवळ श्रीकृष्ण कॉलनी जगन्नाथ नगर असे लिहिले आहे त्यात ज्ञानगंगा डुप्लेक्स चा उल्लेख नाही त्यामुळे शासन प्रशासनाला आमदार सुधाकर अडबाले हे दिशाभूल करत आहे.
ज्ञानगंगा डुप्लेक्स इमारत ही चार व्यक्तीसाठी होती त्यात सुधाकर अडबाले यांची पतसंस्थ, रवींद्र जेणेकर(सौं रुपाली जेणेकर), शेषेराव देऊरगल्ले, विजय चलाख हे चार रहिवाशी चार डुप्लेक्स मध्ये सुरुवातीपासून राहतात व आता डुप्लेक्स क्रमांक 4 हे सुधाकर अडबाले यांचा मुलगा जो त्यांचा भाऊ निलकंठ अडबाले यांना दत्तक दिला त्या राहुल निलकंठ अडबाले यांनी विकत घेतल्याने आता तिथे पण पतसंस्थेचे कामकाज चालत आहे.
त्या डुप्लेक्स च्या खाली असलेल्या सार्वजनिक पार्किंग च्या जागेवर आमदार सुधाकर अडबाले यांनी जनसंपर्क कार्यालय उघडले आहे आणि तिथे आमदाराच्या भेटीला येणाऱ्या लोकांच्या गाड्या पार्किंग करायला जागा नसल्याने स्थानिक रहिवाशांना मोठी अडचण निर्माण झाली आहे,
या इमारतीमध्ये एस. एस. डी. डेव्हलपर्स व पार्टनर यांनी महानगरपालिकेतील मंजूर नकाशाप्रमाणे चार डुप्लेक्स तयार करून रहिवासी वापर करण्यासाठी विक्री केले. व नियमानुसार सर्वासाठी आवश्यक सामुहीक पार्किंगची जागा सोडली होती. मात्र पार्किंगच्या जागेवर अतिक्रमण करून अवैध व नियमबाह्य हॉल बांधकाम आणि जिना बांधकाम आमदार अडबाले यांनी केले.
महत्वाची बाब म्हणजे डुप्लेक्स क्रमांक 2 मध्ये पतसंस्थेचे कार्यालय सुरू केल्याने सर्व रहिवाशांना याचा नाहक त्रास होत आहे. या पतसंस्थेत दिवसभरात येणाऱ्या लहान मोठ्या वाहनामुळे ट्रॉफिक जॉम, कर्णकर्कश हॉर्न, याचा दिवसभर त्रास होतो. या सर्वांचा मुलांना व वृध्दांना शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे या सर्व बाबी एक जबाबदार आमदार लोकप्रतिनिधी करत असेल तर हे निश्चितच दखलपात्र गुन्हा केल्यासारखे आहे.
दरम्यान जर सार्वजनिक जागेवर कुणी सरपंच सदस्य अतिक्रमण केल्यास त्याचे सदस्यत्व रद्द होते तसे आमदार अडबाले यांचे सदस्यत्व रद्द करावे, कारण जो व्यक्ती शिक्षकी पेशात काम करत होता आणि त्यांनी विद्यार्थ्याना शिकवले .
आज ते शिक्षक मतदार संघाचे आमदार आहे म्हणजे ते शिक्षकांचे प्रतिनिधित्व करताहेत आणि ते जर सार्वजनिक पार्किंग च्या जागेवर अतिक्रमण करून तिथे आमदारकीचे जनसंपर्क कार्यालय थाटत असेल तर हे निश्चितच कायदेभंग करणारे असल्याने आपण सुधाकर अडबाले यांची आमदारकी रद्द करावी व लोकशाहीमध्ये एक नवा पायंडा पाडावा अशी मागणी मनसे कडून करण्यात आली आहे. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जनहित कक्ष विभाग जिल्हाध्यक्ष सुनील गुडे, मनोज तांबेकर, पीयूष धूपे, राज वर्मा व इतर पदाधिकारी उपस्थित होते.