🔸 दूरदृष्यप्रणालीद्वारे लाभार्थ्यांसोबत संवाद
✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर (दि. 13 एप्रिल ) : – गोरगरीब नागरिकांचे सण गोड व्हावे, यासाठी राज्य शासनाने दिवाळीत आनंदाचा शिधा वाटप करून सर्वसामान्यांना दिलासा दिला. हाच आनंदाचा शिधा आता गुडीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीलासुध्दा देण्यात येत आहे. जिल्हास्तरीय अधिका-यांनी योग्य नियोजन करून लाभार्थ्यांपर्यंत आनंदाचा शिधा वेळेत पोहचवावा, अशा सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
मुंबई येथून दूरदृष्यप्रणालीद्वारे आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी आणि धान उत्पादक शेतका-यांना प्रोत्साहनपर बोनस याबाबत लाभार्थ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी अन्न नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण, सचिव श्री. वाघमारे, जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आश्विनी मांझे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी पांडूरंग माचेवाड व लाभार्थी उपस्थित होते.
आनंदाच्या शिधाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला थोडा आनंद देऊ शकलो, याचे समाधान आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, जिल्हास्तरीय अधिका-यांनी टीम लावून वेळेत हा शिधा लाभार्थ्यांपर्यंत पोहचवावा. गोरगरीब नागरिकांचे सण गोड व्हावे, यासाठी योग्य नियोजन व प्रभावी अंमलबजावणी करावी. लाभार्थ्यांना याबाबत काही सुचना करायच्या असेल तर त्यांनी मनमोकळेपणाने सांगावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. आनंदाच्या शिधाअंतर्गत 100 रुपयांत एक किलो साखर, एक किलो चनाडाळ, एक किलो रवा आणि एक किलो तेल पॅकेट स्वरुपात दिले जाते.
आनंदाचा शिधा : चंद्रपूर जिल्ह्यात आनंदाच्या शिधाचे एकूण 4 लक्ष 5 हजार 282 लाभार्थी असून यात अंत्योदय योजनेतील 1 लक्ष 36 हजार 390 तर प्राधान्य कुटुंबातील 2 लक्ष 68 हजार 892 लाभार्थी आहेत. जिल्ह्यात 99 टक्के आनंदाच्या शिधाचे पॅकेट उपलब्ध झाले असून आतापर्यंत 50 टक्के नागरिकांना वाटप झाले आहे. उर्वरीत नागरिकांनी त्वरीत आनंदाचा शिधाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शिवभोजन थाळी : सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण 44 केंद्रात शिवभोजन थाळी उपलब्ध आहे. यात प्रतिदिन 47253 शिवभोजन थाळी देण्यात येत आहे.
धान उत्पादक शेतक-यांना बोनस : जिल्ह्यात 34614 धान उत्पादक शेतक-यांची नोंदणी झाली असून आतापर्यंत 32985 शेतक-यांना 67 कोटी 27 लक्ष 54 हजार 770 रुपये बोनस वाटण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने दिली.