🔸शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी २२ मे रोजी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा
✒️विश्वनाथ महामुने महागाव(Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.13 मे) :-
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असतानाच, प्रशासकीय दिरंगाईमुळे हजारो शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहीले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी पीक विमा कंपनीला अपूर्ण माहिती दिल्याचा खळबळ जनक आरोप करत जन आंदोलन आधार संघर्ष समिती आता आक्रमक झाली आहे. येत्या २२ मे २०२६ रोजी महागाव तहसील कार्यालयावर ‘हाहाकार मोर्चा’ काढण्याचा जन आंदोलन संघर्ष समितीने इशारा दिला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीने केवळ पिकेच नाही, तर सुपीक जमीनही वाहून गेली आहे. जमिनीला पडलेले उभे चर आणि फुटलेले बांध पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. मात्र, या संकट काळात आधार देण्या ऐवजी जिल्हाधिकारी कार्यालया कडून विमा कंपन्यांना योग्य माहिती न गेल्याने विम्याची रक्कम अडकून पडली आहे. खरीप हंगाम तोंडावर असतांना बियाणे आणि खतांसाठी पैसे नसल्याने शेतकरीवर्ग आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे.
नांदेड जिल्ह्या प्रमाणेच यवतमाळ मधील शेतकऱ्यांनाही तातडीने भरघोस आर्थिक मदत आणि पीक विम्याचे वाटप करण्यात यावे,अशी ठाम मागणी ओवा समितीने केली आहे. “प्रशासनाच्या आडमुठे पणामुळे शेतकरी देशोधडीला लागला असून, आता शेतकऱ्यांचा संयम सुटल्याने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जन आंदोलन आधार संघर्ष समितीच्या वतीने २२ मे २०२६ शुक्रवारी हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ‘हाहाकार मोर्चाचे’ आयोजन करणार असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची ही लढाई असून, आता सरकार आणि प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.विम्याच्या लाभ मिळण्या पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी या हाहाकार मोर्चात सहभागी होण्याचे जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी आव्हान केले आहे.
अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे त्यांना विम्याचा लाभ मिळणे अपेक्षित असतांना जिल्हाधिकारी यांच्या हलगर्जी पणामुळे शेतकऱ्यांना विमा मिळण्या पासुन वंचित राहावे लागले.लगतच्या नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यात शेतकऱ्यांना विमा मिळावा या करिता पाठपुरावा केला. त्याची फलश्रुती म्हणुन हजारो कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना मिळाली.परंतु आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे कोणतेच सोयर सुतक नसल्याने त्यांनी या कडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना आर्थिक संकटात ढकलण्याचे काम केले आहे. दोशी अधिकाऱ्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना तात्काळ भरघोस मदत मिळाली पाहिजे अन्यथा ‘हाहाकार मोर्चाद्वारे’ शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन रस्त्यावर उतरू.
जगदीश नरवाडे,
संस्थापक अध्यक्ष, जनआंदोलन आधार संघर्ष समिती







