🔸पाण्याचा विसर्ग वाहून गेल्याने गुरा वासरांना पाणी मिळणे दुरापस्त
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.13 मे) :-
‘धरण उशाला पण कोरड घशाला’ असी म्हणण्याची तहानलेल्या जीवांना वेळ आली आहे. उन्हाळ्याच्या तीव्र झळा वाढल्या आहे. यापुढे एक महिना तीव्र उष्णतामान असणार आहे. पुस नदीपात्रातील पाणीसाठा वाहून गेल्याने गुरावासरांना पाणी मिळणे दुरापस्त झाले आहे. आठवडा भरा पूर्वी अधरपुस प्रकल्पातून पुस नदीपात्रात पाणीसाठा सोडण्यात आला होता. परंतु या ठिकाणी अस्तित्वात असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे लोखंडी गेट जीर्ण होऊन गंजून गेले, निकामी झाले. परिणामी सोडण्यात आलेले पाणी आले तसे वाहून गेले. नदीपात्र ठणठणात झाल्याने नदी काठावरील शेतकऱ्यांसह गुरा वासरा करिता पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. प्रशासनातील संबंधितांनी तातडीने बंधाऱ्याच्या गेट दुरुस्तीकडे लक्ष देऊन नदीपात्रात पाणी साठा कायम राहील याची व्यवस्था करावी,अशी नदीकाठावरील शेतकऱ्यांतून मागणी होत आहे.
महागांव शहराला लागून वाहणाऱ्या पूसनदीचे पात्र सध्या कोरडे पडले आहे. नदीपात्रात पाणी नसल्याने केवळ वाळवंट झाला आहे. कमळेश्वर मंदिरालगत असलेल्या पुस नदी पात्रात कोल्हापुरी बंधारा अस्तित्वात आहे. बंधाऱ्याचे लोखंडी गेट्स मागील अनेक वर्षापासून पूर्णतः झिजून निकामी झाले. तर गेट्सचे काही लोखंडी भाग चोरट्याने चोरून नेले. अनेक वेळा पाणी समस्येसाठी ‘माध्यमा’ द्वारे पाणीप्रश्नी वृत्तांकन करण्यात आले. या विभागाचे आमदार किशनराव वानखेडे यांनी दखल घेत अधरपूस प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा केल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशा नुसार मागील आठवड्यात धरणातून पाणी सोडण्यात आले. परंतु येथील बंधाऱ्याला गेटच सुस्थितीत नसल्याने जलसाठा आला तसा वाहून गेला. परिणामी आज रोजी नदीकाठा वरील शेतकऱ्यांसह गुरावासरांचा पाणी प्रश्न कायम आहे. यापुढे एक महिना उष्णतामान असल्याने मुक्याजीवांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने दखल घेत पुस नदीपात्रातील कोल्हापुरी बंधाऱ्याचे गेट्स तातडीने दुरुस्ती करून बसवण्यात यावेत, जेणेकरून या ठिकाणी धरणातून आलेला पाणीसाठा कायम राहून पाणी प्रश्न निकाली निघेल.
या विभागाचे आमदार किशनराव वानखेडे यांनी धरण व्यवस्थापन अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून गेट बसविण्याच्या सूचना केल्याची माहिती आहे. परंतु बंधाऱ्याच्या गेट दुरुस्ती, व्यवस्थे बाबत अद्याप संबंधितांकडून कुठल्याही प्रकारची प्रगती दिसत नाही. तातडीने दखल घेत बंधारेच्या गेटची दुरुस्ती करण्यात यावी, जेणेकरून ह्या ठिकाणी गुरा वासरांसाठी मुबलक पाणी साठा कायम राहील अशी शेतकऱ्यांतून मागणी जोर धरत आहे.







