✒️नागपूर(Nagpur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
नागपूर(दि.27 जानेवारी) :-
कुटुंबीयांना दवाखान्यात दाखवण्यासाठी काही मित्रांकडे माहिती घेत होतो. अनेकांनी एक नाव सुचवलं. मी त्या दवाखान्यात जाण्याचा निर्णय घेतला. पण, असं कळलं की दवाखान्यात नंबर लावायचा असेल पहाटे 5 वाजताच रुग्णालयाच्या बाहेरच्या रांगेत लागावे लागेल. हे ऐकून थक्कच झालो. असं वेगळं पण काय आहे, जिथे डॉक्टरला भेटण्यासाठी पहाटेपासूनच किंवा सकाळी सकाळी उठूनच जावे लागते, याविषयी माझ्याही मनात कुतूहल निर्माण झाले होते. योगायोगाने डॉक्टरांकडे तपासणीसाठी जाण्याच्यापूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिक्रिया घेण्याच्या उद्देशाने डॉक्टरांकडे जाण्याचा योग आला. त्यावेळी पहिल्याच भेटीत त्यांच्याशी गप्पा करताना वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञानसंपन्नतेचा अनुभव आला. सामाजिक जाण आणि राष्ट्रप्रेम त्यांच्यात दिसून येत होते. मुलाखत साधारणतः अर्धा तास पार पडली आणि मी त्यांचा निरोप घेतला.
महिनाभरानंतर मी त्यांच्या दवाखान्यात नंबर लावण्यासाठी साधारणतः साडेसात वाजता पोहोचलो. मी पोहोचण्याआधीच 30-40 लोकांची रांग दिसली. टपरीवरील गरम चहाचा आस्वाद घेत जागा पकडणारे रुग्णांचे नातेवाईक. कुणी रुमाल टाकून तर कुणी बॅग ठेवून उभे होते…. हे चित्र पाहिल्यावर वाटलं की इथे काहीतरी विलक्षण घडतं. रांगेत उभे असलेल्या प्रत्येकाला एकच आशा होती ती म्हणजे, डॉक्टरांकडून औषध घेण्याची.
सकाळचे नऊ वाजले. रुग्णालयातील कर्मचारी पोहोचला. तेव्हा डॉक्टरांपेक्षा तो कर्मचारी आल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्याने “चिठ्ठ्या” वाटायला सुरुवात केली. मला 43 क्रमांकाची चिट्ठी मिळाली. सर्वांना क्रमांक मिळाला आणि गर्दी गायबच झाली. ही चिठ्ठी म्हणजे एक छोटं पॉकेट असते. त्यावर एक क्रमांक आणि डॉक्टरला भेटण्याची वेळ असते. इतकेच नव्हेतर एक सुविचार असतो. प्रत्येक रुग्णाला काही मिनिटांची ठरलेली वेळ दिली जाते, त्यानुसार डॉक्टरांच्या केबिनमध्ये त्यांचा नंबर लागतो. इतकी गर्दी असूनही कोणत्याही प्रकारचा गोंधळ होत नाही. इथला नियम स्पष्ट आहे – गरीब असो की श्रीमंत, सर्वांनी एकाच रांगेत उभे राहायचे आणि आपली वेळ येण्याची वाट पाहायची.
या दवाखान्याची आणखी एक विलक्षण गोष्ट म्हणजे डॉक्टरांचा वैद्यकीय दृष्टिकोन. गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टरांनी रुग्णांना प्रत्यक्ष बघणे बंद केले आहे. असे समजले की ते एका अपघातात डोळ्यांनी अंध झालेत. पण त्यांच्या अनुभवसंपन्न हातांनी तपासलेली नाडी, आणि त्यावर आधारित दिलेली औषधे, आजही रुग्णांना ठाम बरे करतात. त्यामुळे दृष्टीहीन घटनेनंतरही रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी उलट वाढत गेली. ही क्षमता आणि अचूकता त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवातून मिळवली आहे.
डॉक्टरांच्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी देशभरातून लोक येतात. दिवसाला 70 ते 80 रुग्ण त्यांना भेटतात. विशेष म्हणजे, इथे व्हीआयपींसाठीही वेगळे नियम नाहीत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसारख्या दिग्गज नेत्यांनीदेखील इथे उपचार घेतले आहेत. डॉक्टरांच्या जुन्या दवाखान्यात आजही या व्यक्तींचे आणि डॉक्टरांचे दुर्मिळ छायाचित्र पाहायला मिळतात. यात आणखी एका फोटोची भर पडणार आहे ती म्हणजे राष्ट्रपतींच्या हातून देशातील सर्वोच्च पुरस्कार घेताना….
भारत सरकारने त्यांच्या या निःस्वार्थ सेवेसाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. ही बातमी कळताच माझ्यासह त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सामान्य रुग्णांपासून ते प्रतिष्ठित नागरिकांपर्यंत प्रत्येकाने अभिमान व्यक्त केला.
या डॉक्टरचे नाव आहे डॉ. विलास डांगरे. हे वैद्यकीय सेवेतले एक आदर्श उदाहरण आहेत, ज्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग गरजवंतांसाठी केला. अशा डॉक्टर्समुळे आजही मानवतेची भावना प्रखरतेने जिवंत आहे.
ही प्रॅक्टिस केवळ व्यवसाय नसून ती एक मानवी सेवा आहे. केवळ 200 रुपयांच्या सवलतीच्या दरात औषधोपचार करून त्यांनी अनेकांना बरे केले आहे.