विजयाच्या संकल्पाची मशाल हृदयात प्रज्वलित करा

Share News

🔹आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी वाढवले खेळाडूंचे मनोबल

🔸शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारा आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि .16 जानेवारी) :- प्रयत्न करणाऱ्याला कधीही अपयश येत नाही. त्यामुळे आयुष्याच्या या स्पर्धेत आपल्या हृदयात प्रयत्नांची मशाल तेवत ठेवा. हृदयात प्रयत्नांच्या पराकाष्ठेची, विजयाच्या संकल्पाची मशाल प्रज्वलित करा. त्यानंतर जगातील कुठलीही शक्ती तुम्हाला पराभूत करू शकणार नाही, या शब्दांत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी खेळाडूंचे मनोबल वाढवले.

चंद्रपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारा आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन आ. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलेत होते. या कार्यक्रमाला आयटीआयचे (आयएमसी) अध्यक्ष सी. एम. राव, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी वैभव बोनगीरवार, प्राचार्य श्री. वानखेडे, क्रीडा अधिकारी श्री. आवारे, स्टेट बँकेचे अधिकारी श्री. पवनकर. भाजपा महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, भाजप नेते प्रकाश धारणे, मोरेश्वर गायकवाड आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

ते म्हणाले, ‘या जिल्ह्यात ‘मिशन ऑलिम्पिक २०३६’ ची सुरुवात मी केली. आपल्या जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये शक्ती, गुण, कौशल्य आहे. पण त्या गुणांना प्रयत्नांची जोड द्यावी लागेल. एखादं बीज आलमारीत ठेवलं तर त्याचं झाड होत नाही. तेच बीज जमीनीत पेरलं आणि त्याला खतपाणी दिलं तर त्याचं झाड होतं. आपल्या हृदयातही बीज आहे. पण त्याचा वृक्ष करण्यासाठी प्रयत्नांचं खतपाणी द्यावं लागेल.’

चंद्रपूरचे लोक कुठेही कमी नाहीत. सी फॉर चंद्रपूरप्रमाणेच सी फॉर चॅम्पियन होण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वोत्तम सुविधा चंद्रपूरमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. चंद्रपूर जिल्हा स्टेडियमला ५७ कोटी रुपयांचा निधी दिला. चंद्रपुरात बॅडमिनंटनचे स्टेडियम उत्तम झाले आहे. पुण्यातील बालेवाडीनंतर सर्वोत्तम बॅडमिंटनहॉल आपल्या वाघाच्या भूमित आहे. बल्लारपूरचे स्टेडियम, सैनिक शाळेचे स्टेडियम, पोंभुर्णा, मुल, वन अकादमीतील स्टेडियम बघा. सर्वोत्तम सुविधा आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. विसापूर आणि बल्लारपूरलाही आपण स्टेडियम करतोय. आपल्यापैकी कुणीतरी ऑलिम्पिकमध्ये पदक घेतलेच पाहिजे, या उद्देशाने प्रत्येक पाऊल टाकत आहोत, असंही ते म्हणाले. 

आपण मिशन शौर्य सुरू केले. यात आपल्या जिल्ह्यातील १७-१८ वर्षांचे आदिवासी तरुण एव्हरेस्टवर गेले. ते कधीही विमानात बसले नव्हते. पण त्यांनी ३० हजार फुट उंचावर जाऊन एव्हरेस्टवर झेंडा गाडला. देशगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी लाल किल्ल्यावरून या तरुणांचे कौतुक केले, याचा आ. श्री. मुनगंटीवार यांनी आवर्जून उल्लेख केला.

*स्टेडियम बांधून पदक मिळणार नाही*

आपल्या येथील खेळाडूंमध्ये क्षमता कमी नाही. पण व्यवस्थेची उणीव होती. म्हणूनच इनडोअर स्टेडियम करतोय. नवीन चंद्रपूर म्हाडामध्ये १६ एकर जागा मिळाली आहे. याठिकाणी वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने भव्यदिव्य स्टेडियम तयार होत आहे. पण स्टेडियम बांधून पदक मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, असे आवाहनही आ. श्री. मुनगंटीवार यांनी केले. 

*तरच मेरा भारत महान!*

२०२० पर्यंत १२० वर्षांत भारतासारख्या मोठ्या देशाने केवळ २८ पदकं जिंकली. अमेरिकेने २५२० जिंकली. तर रशियाने १२२२ पदकांवर नाव कोरले. २०४७ मध्ये स्वातंत्र्याच्या शताब्दी उत्सवात भारताचा तरुण समर्थपणे पुढे गेलेला असेल, तरच १९३ देशांमध्ये खऱ्या अर्थाने ‘मेरा भारत महान’ होईल, अशा भावना आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

Share News

More From Author

विदर्भ कोकण ग्रामीण बँक चंदनखेडा च्या खातेदाराला PMJJBY चा मोबदला

मोफत शस्त्रक्रिया साठी 33 रुग्ण नागपूर साठी रवाना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *