अवैध उत्खनन करणारी एक जेसीबी मशीन व पाच ट्रॅक्टर जप्त

Share News

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.23 ऑक्टोबर) :- वरोरा तालुक्यातील डोंगरगाव (रेल्वे) येथे रेल्वेच्या तिसऱ्या लाईन करिता अवैध उत्खनन करून विना परवानगीने मुरुमाची वाहतूक केली जात आहे. यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी छोटूभाई शेख यांनी आंदोलना दरम्यान केली होती. महसूल विभागाच्या चौकशीत अवैध उत्खनन होत असल्याचे उघड झाल्यानंतर लाखो रुपयांचा दंड रेल्वे विभागाच्या संबंधित कंत्राटदाराला बजावण्यात आला होता. 

परंतु दंडाची रक्कम वेळेत न भरल्याने महसूल विभागाच्या निर्देशानुसार पोलिसांनी सोमवार दि.२१ ऑक्टोबर रोजी घटनास्थळी पोहोचून अवैध उत्खनन करणारी एक जेसीबी मशीन आणि मूरमाची अवैध वाहतूक करणारे पाच ट्रॅक्टर ताब्यात घेऊन जप्त केले.

 वरोरा तालुक्यातील डोंगरगाव (रेल्वे) परिसरात रेल्वेच्या तिसऱ्या लाईनचे काम सुरू या कामाकरिता लागणाऱ्या मुरूमासाठी अवैध उत्खनन केले जात आहे. उत्खनन होत असलेली जागा रेल्वेची असल्याचे भासवून त्यातून निघणाऱ्या मुरमाची वाहतूक करताना रॉयल्टी भरण्यात येत नव्हती. हा प्रकार लक्षात येतात वरोरा येथील सामाजिक कार्यकर्ते छोटेभाई शेख यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी या संदर्भात महसूल विभागाकडे तक्रार केली. परंतु प्रारंभी या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्या गेले.

परिणामी छोटूभाई शेख यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. तसेच पाण्याच्या टाकीवर चढून विरूगिरी आणि मुंडन आंदोलन करण्यात आले होते. यानंतर ९ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला डोंगरगाव (रेल्वे) येथील सरपंच, उपसरपंच ,ग्रामस्थ आणि छोटूभाई शेख उपस्थित होते. बैठकीतील चर्चेनंतर अवैध उत्पन्न होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे महसूल विभागाने रेल्वे अधिकारी सिद्धार्थ गुप्ता, सा.कार्यकारी अभियंता व काम करणारे कंत्राटदार यांच्या विरोधात दि. १७/१०/२४ रोजी दंडाचे आदेश बजावले. परंतु संबंधितांनी दंडाची रक्कम वेळेत भरली नाही.

यामुळे सोमवार दि. २१ ऑक्टोबर रोजी महसूल विभागाच्या निर्देशानुसार अवैध उत्खनन स्थळावर सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मेश्राम, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद भस्मे, पोलीस उपनिरीक्षक दीपक ठाकरे, शिपाई महेश गोवतूरे यांनी धाड टाकली. आणि अवैध उत्खनन करणारी जेसीबी मशीन व पाच ट्रॅक्टर यांच्यावर जप्तीची कारवाई केली. सदर कारवाईवरून रेल्वे कंत्राटदार अवैध उत्खनन करीत होते हे उघड झाले असल्याने दि.१७ ऑक्टोबर रोजीच्या तहसीलदार यांच्या आदेशावरून रेल्वे अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी छोटू भाई शेख यांनी तक्रारीतून पोलिसांकडे केली आहे.

Share News

More From Author

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मुल व पोंभुर्णात सात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र

शेतमालाला हमी भावाने खरेदी करा ;शेतकर्‍यांचे तहसिलदाराला निवेदन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *