देशसेवेतून भारत मातेचा सन्मान वाढवा

Share News

🔹ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा भावी सैनिकांना संवाद

🔸सैनिक स्कूल येथे राष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेचे आयोजन

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.29 सप्टेंबर) : – सैनिक स्कूलमध्ये शिकताना ‘लोक काय म्हणतात’ याचा कधीही विचार करू नका. आपल्याला काय करायचे आहे, हे लक्षात घेत आपण आपले ध्येय निश्चित करायला हवे. तुमचे हस्ताक्षर ऑटोग्राफमध्ये जेव्हा बदलतील, तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनाचे आकलन आणि मूल्यांकन करता येईल. तुम्ही भारत मातेसाठी, भारत मातेच्या आनंदासाठी कार्य करा. या देशाची सेवा करून भारत मातेचा सन्मान आपण वाढविला पाहिजे, असा कानमंत्र वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भावी सैनिकांना दिला आहे.

बल्लारपूर तालुक्यातील सैनिक स्कूल येथे राष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी देशभरातील ४२ सैनिकी शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांशी ना. श्री. मुनगंटीवार यांनी संवाद साधला. शाळेचे मुख्याध्यापक कॅप्टन अश्विन अनुप देव, उपमुख्याध्यापक लेफ्टनंट कर्नल संजय पटियाल, कार्यालयीन अधिकारी रजथ जी व्यासपीठावर उपस्थित होते. 

महिलांनी प्रत्येक क्षेत्रात प्रसंगी पुरुषांपेक्षाही मोलाची कामगिरी बजावली आहे. राजमाता जिजाऊंपासून राणी लक्ष्मीबाईपर्यंतचा इतिहास आपल्याला हे दाखवून देतो. त्यामुळे सैनिक शाळेतही विद्यार्थिनींसाठी जागा असाव्या आपला आग्रह होता. परंतु अधिकाऱ्यांनी आपल्याला अशी कोणतीही तरतूद नसल्याचे सांगितले. नारीशक्ती कोणापेक्षा कमी नाही, हे ठाऊक होते. त्यामुळे आपण ही बाब योग्य नसल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. आपण नारीशक्तीला आदीशक्ती स्वरुपात पुजतो, मानतो. त्यामुळे त्यांना स्थान मिळालेच पाहिजे, असा आग्रह केल्याचे ना.मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

विद्यार्थिनींच्या विषयावर जेव्हा अधिकाऱ्यांसोबत ही चर्चा सुरू होती, त्यावेळी देशाच्या रक्षामंत्री निर्मला सीतारामण होत्या. आपण अधिकाऱ्यांना सांगितले की, जसे रक्षामंत्री म्हणून सीतारामण कमी पडणार नाही, अगदी त्याच पद्धतीने देशाच्या रक्षणात मुली कधीही कमी पडणार नाहीत. अधिकाऱ्यांना हा मुद्दा पटला. त्यानंतर देशात प्रथमच सैनिक शाळेत विद्यार्थिनींना दहा टक्के आरक्षण मिळाले. पहिल्यांदा हे आरक्षण मिळाले ते चंद्रपूरच्या सैनिक शाळेत. त्यानंतर देशातील इतर शाळांमध्ये ही पद्धत सुरू झाल्याचे ना.मुनगंटीवार यांनी नमूद केले. चंद्रपूरनंतर देशाच्या अन्य सैनिक शाळांसाठी शासन निर्णय काढण्यात आला. 

सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये ना.मुनगंटीवार यांनी राष्ट्रभक्तीचे स्फूरण भरले. तुमची सही जोपर्यंत ‘ऑटोग्राफ’ बनणार नाही, तोपर्यंत शांत बसू नका. मातृ-पितृ आणि राष्ट्रभक्तीशिवाय कोणतीही भक्ती श्रेष्ठ नाही. राष्ट्रभक्ती करताना कार्य असे करा की तुमच्या आईवडिलांची मान अभिमानाने ताठ झाली पाहिजे. विद्यार्थी दशेपासूनच स्वत:ला असे घडवा की अख्ख्या देशाने तुमच्या कार्याला कडक सॅल्यूट केला पाहिजे, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.

Share News

More From Author

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे दोन दिवसीय चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर

आर्थिक स्वातंत्र्याच्या क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *