कौशल्य प्रशिक्षणातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास-जिल्हाधिकारी विनय गौडा

🔹आदिवासी विद्यार्थ्यांच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.23 मे) :- शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विकसीत करण्यासाठी तसेच त्यांना कार्यक्षम बनविण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणाची अत्यंत गरज आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर कार्यालयाने एक अनोखा उपक्रम राबविला असून अशा कौशल्य प्रशिक्षणातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास शक्य आहे, असे मत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी व्यक्त केले.

बोर्डा येथील शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेत आयोजित उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर जात पडताळणी समितीचे सहआयुक्त विनोद पाटील, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त दशरथ कुळमेथे, तहसीलदार विजय पवार, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी विकास राचलेवार(चंद्रपूर), दीपक हेडाऊ (वर्धा), नितीन ईसोकर (नागपूर), उमेश काशीद (देवरी), शिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्विनी सोनवणे उपस्थित होत्या.  

विद्यार्थ्यांमध्ये असलेले वेगवेगळे कौशल्य विकसीत करणे, या उद्देशानेच आदिवासी विकास विभागाने उन्हाळी प्रशिक्षण आयोजित केले, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, हा एक अनोखा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आला आहे. या एक महिन्याच्या कालावधीत आदिवासी विद्यार्थ्यांनी घेतलेले प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिके पाहून अतिशय आनंद झाला. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आणि शक्ती आहे. अशा उपक्रमामुळे त्यांना एक व्यासपीठ मिळाले असून त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात नक्कीच होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

उपवनसरंक्षक श्वेता बोड्डू म्हणाल्या, येथे येऊन आज अतिशय आनंद झाला. रोजगारासाठी कौशल्य आणि प्रशिक्षणाची गरज आहे. केवळ पुस्तकी शिक्षण नाही तर व्यक्तिमत्व विकासासाठी आदिवासी विकास विभागाने हे प्रशिक्षण शिबीर आयोजित केले. तर सहआयुक्त विनोद पाटील म्हणाले, हा एक स्तुत्य उपक्रम असून विद्यार्थ्यांचा खरा विकास हाच आहे. यावेळी नागपूरचे उपआयुक्त दशरथ कुळमेथे यांनीसुध्दा मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी विकास राचलेवार म्हणाले, 23 एप्रिल ते 22 मे या कालावधीत बोर्डा येथील आश्रमशाळेत आयोजित उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात 142 विद्याथी सहभागी झाले. सात विषयांचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यात इंग्लीश स्पिकींग, गोंडी वारली पेंटींग, तायक्वांडो, आर्चरी, योागा, व्यक्तिमत्व विकास, संगीत व कला या विषयांचा समावेश होता. तसेच शारीरिक व्यायाम व खेळसुध्दा येथे घेण्यात आले, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन उमेश कडू यांनी केले. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी गोंडी नृत्य, आर्चरी आणि तायक्वांडोचे सादरीकरण केले. कार्यक्रमाला बोर्डा येथील आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका जया राऊत यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, अधिक्षक, अधिक्षिका, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उत्कृष्ट विद्यार्थ्यांना पारितोषिक : – एक महिन्याच्या कालावधीत उत्कृष्ट गुणांकन मिळविणा-या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. यात प्रेरणा कालीदास आलाम, आचल गुरुदास धारणे, वैष्णवी मंगेश जुमनाके, सीमा नागोजी जिवतोडे, धीरज उमेश रणदिवे, कृष्णा बंडू गेडाम आणि भीमराव दिनकर कोडकोटे या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

प्रशिक्षकांचाही सत्कार : – यावेळी प्रशिक्षक अनिल दहागावकर (इंग्लीश स्पिकिंग), एस.आय. लांजेवार, पी.टी. गावळ (गोंडी वारली पेंटींग), अनुष्का काळे, तुषार दुर्गे (तायक्वांडो), गिरीश कुकडे, अक्षक टेकाडे (आर्चरी), माधुरी वानकर (योगा), सी.एन. कंदालवार (व्यक्तिमत्व विकास), विशाल बावणे, राहुल पडघणे (संगीत व कला) उमेश कडू, के.जी. चिंचोळकर (शारीरिक व्यायाम व खेळ)