उन्हाळी शिबिरातून आदिवासी विद्यार्थ्यांचे कौशल्य गुण

🔸142 विद्यार्थ्यांचा विविध प्रशिक्षणात सहभाग

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.16 मे) : – एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत 23 एप्रिल ते 22 मे 2024 या कालावधीत उन्हाळी शिबीर हा उपक्रम राबविला जात आहे. प्रकल्पात पहिल्यादांच अशा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून विविध प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे कलागुण विकसीत होण्यास मदत होईल, असा विश्वास प्रकल्प अधिकारी विकास राचलेवार यांनी व्यक्त केला.

शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा बोर्डा (ता. चंद्रपूर) येथे करण्यात आले आहे. उन्हाळी शिबिरात शासकीय/ अनुदानित आश्रम शाळेतील एकूण 142 विद्यार्थी (62 मुले व 80 मुली) सहभागी झाले आहेत. शिबिरात विद्यार्थ्यांच्या निवासाची, भोजनाची व प्रशिक्षणाची मोफत सोय करण्यात आली आहे. प्रशिक्षित मार्गदर्शक /प्रशिक्षक यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.

1. योगा प्रशिक्षण माधुरी वानकर यांच्यामार्फत दिले जात असून यात योगा विषयीची माहिती, योगाचे फायदे, ओंकार साधना, पूरक हालचाली, योगासन आदींचा समावेश आहे.

2.आर्चरी प्रशिक्षण गिरीश कुकडे व अक्षय टेकाडे यांच्यामार्फत देण्यात येत आहे. यात धनुर्विद्या या खेळामध्ये धनुष्याबाण चालवून आपले लक्ष कसे भेदायचे याचा सराव देण्यात येत आहे.

3.गोंडी पेटींग प्रशिक्षण सुभाष लांजेवार व पी.टी.गवाळ यांच्यामार्फत देण्यात येत आहे. यात वारली पेन्टिंग मध्ये त्रिकोण,चौकोण, वर्तुळ आणि रेषाच्या माध्यमातून पेन्टिंग, त्यामध्ये विटांची लाल भुकटी, तांदळाची पीट, शेण, कोळसा यांचा वापर करण्याच्या उद्देशाने गोंडी आणि वारली पेन्टिंगचे प्रशिक्षण दिले जात आहे.

4.तायक्वांडो प्रशिक्षण तुषार दुर्गे व अनुष्का काळे यांच्यामार्फत देण्यात येत आहे. यात किक्स, पचेस, ब्लॉकिंग, स्व:रक्षण याचा समावेश आहे.

5.व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण चंद्रशेखर कंदालवार देत आहेत. यात उद्दिष्ट, वेळेचे बंधन, बायोडाटा लिखाण, संवाद कौशल्य या मुद्यावर विद्यार्थ्यांना परीपक्व करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच काय करावे, काय करु नये, कधी, कुठे, काय बालायचे, कसे वागायचे आपले सामर्थ्य, आपल्यातील कमजोरी, आपल्याला मिळालेली संधी, होणारे संभाव्य धोके यावर नियत्रंण व मंच वापर कसा करायचा याचे प्रशिक्षण या माध्यमातून दिले जात आहे. 6.इंग्लीश स्पीकिंग कोर्स अनिल दहागावकर यांच्यामार्फत देण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजी विषयाची भीती आणि न्यूनगंड असल्यामुळे ते दूर करण्यासाठी विविध मानसशास्त्रीय प्रशिक्षण तंत्राचा अवलंब करून सरावावर भर देण्यात येत आहे. या माध्यामातून विद्यार्थ्यांना इंग्रजी संदर्भात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 7.संगीत कला प्रशिक्षण विशाल बावणे व राहून पडघने देत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये संगीत विषयाची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांना स्वयंरोजगाराची संधी मिळावी या उद्देशाने त्यांना होर्मोनियम, तबला, ढोल इत्यादी वाद्दे वाजविण्याचे तसेच गायनाचे प्रशिक्षण दिले जात आहे.

उन्हाळी शिबिराला प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी / कर्मचारी, मुख्याध्यापक, पालक तसेच वनविभाग, आरोग्य विभागातील अधिकारी / कर्मचारी यांनी भेट दिली आहे. या प्रशिक्षणामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना समाजात एक मानाचे स्थान प्राप्त होण्यास मदत होईल तसेच विद्यार्थ्यांना शिस्त, स्वयंअध्ययन अशा प्रकारच्या सवयी लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी होणार असल्याचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी कळविले आहे.