अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे तातडीने करा

🔹पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

🔸ना.मुनगंटीवार यांच्या भाजपा कार्यकर्त्यांना नुकसानग्रस्तांना मदतकार्य करण्याच्या सूचना

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर,(दि.11 मे) :- वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले, घरांचे नुकसान झाले, शेतकऱ्यांनाही याचा मोठा फटका बसला. या संपूर्ण नुकसानाचे तातडीने पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई करण्याचे निर्देश पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीची पाहणी करावी, अशाही सूचना केल्या. त्याचवेळी भाजपा पदाधिकारी,कार्यकर्त्यांनाही त्यांनी प्रत्यक्ष गावागावांत जाऊन नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी प्रत्यक्ष भेट घेत मदतकार्य करा अश्या सूचना केल्या. ना. श्री. मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधून जिल्ह्यातील एकूण परिस्थितीचा आढावा घेतला व चर्चा केली. 

चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आल्यामुळे मोठे नुकसान झाले. अनेक घरांवरचे छत उडाले, झाडे पडली, वस्त्यांमध्ये व घरांमध्ये पाणी शिरले, विजेच्या तारा तुटल्या. गावांमध्ये विजेचे ट्रान्सफॉर्मर निकामी झाले आणि शेतांमधील कृषीपंपांचे खांबही पडले. झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. या एकूणच जील्ह्यातील परिस्थितीची पाहणी करून लवकरात लवकर पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी, असे निर्देश ना. श्री. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. 

जिल्हाधिकारी,तहसीलदार, मदत पुनर्वसन अधिकारी यांच्याकडे भेट घेत नुकसाभरपाईची देण्यासंदर्भात जे शासन निर्णय अस्तित्वात आहेत त्यात काही सुधारणा अपेक्षित असतील जेणे करुन भरीव मदत मिळेल तर त्या सुधारणा त्वरित सुचवाव्या अश्या सूचना ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना यावेळी केल्या.