अवैध दारू विरोधात उत्पादन शुल्क विभागाची मोठी धडक कारवाई 

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर.(दि.28 मार्च) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतूक यावर सक्त कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज दिनांक २७/०३/२०२४ रोजी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभाग वरोरा व त्यांच्या पथकाने पळसगाव (जाट), ता. सिंदेवाही येथील जंगलात ओढ्याच्या काठी सुरु असलेल्या अवैधरीत्या गावठी दारू गाळण्याच्या भट्टीवर मोठी कारवाई करून दोन अवैध हातभट्टी उध्वस्त केल्या.

तसेच त्यामध्ये शरद महिपाल सहारे व शुभम राजू दुधे या दोन आरोपींना अटक करण्यात आली. सदर कारवाईत १९५० लिटर सडवा व ८० लिटर तयार दारू आणि इतर साहित्य नष्ट करण्यात आले. तसेच त्याच परिसरात दुचाकी वाहनावरून अवैध गावठी दारूची वाहतूक करतांना नामे बिपीन बबन ब्राम्हणे या इसमास अटक करून त्याच्याकडून १० लिटर गावठी दारू व दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. वरील तीनही गुन्ह्यातील मुद्देमालाची किंमत रुपये १,४०,६७०/- एवढी आहे. 

 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहितेच्या काळात अशा प्रकारे अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतूक आढळून आल्यास त्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या कार्यालायचे कार्यक्षेत्रात रात्रीची गस्त घालून अशा प्रकारचे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कसून प्रयत्न करण्यात येत आहेत. 

 वरील कारवाई ही या विभागाचे अधीक्षक श्री. संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. विकास बी. थोरात, निरीक्षक, रा. उ. शु., वरोरा, श्री. प्रमोद राजोते, दु. निरीक्षक ब्रम्हपुरी, श्री. जगदीश मस्के, जवान, श्री. अमोल भोयर, जवान व श्री. विलास महाकुलकर, जवान-नि-वाहनचालक यांनी पार पाडली.

 सदरील गुन्ह्याचा पुढील तपास श्री. विकास बी. थोरात, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, वरोरा व श्री. प्रमोद राजोते, दु. निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ब्रम्हपुरी हे करीत आहेत.