धक्कादायक बातमी….सख्या बापाने दोन मुलींची व पत्नीची केली कुऱ्हाडीने हत्या 

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि .3 मार्च) :- जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात पासून १५ किमी अंतरावर येत  असलेल्या मौशी या गावात रविवारला पहाटे पाच वाजताच्या दरम्यान जन्मदात्या दारुड्या बापाने स्वतःच्या दोन मुलींची व पत्नीची कुराडीने वार करुन हत्या केल्याची घटना घडली.

हे तिहेरी हत्याकांड घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असुन गावात या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अंबादास लक्ष्मण तलमले (४५) असे त्या नराधमाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे की,मुलगा अनिकेत तलमले (१६ ) हा गावातीलच एका पानठेल्यात खर्रा घोटायला अगदी पहाटे ४ वाजता निघून गेल्याने आरोपीने ही संधी साधून भल्या पहाटे तिघीही मायलेकीची कुऱ्हाडीने डोक्यावर व पोटावर वार करून हत्या केली. मुलगा अनिकेत हा खर्रा घोटायला मजुरीने बाहेर गेला असल्याने तो थोडक्यात बचावला. मृतामध्ये पत्नी अल्का अंबादास तलमले (४० ) मुलगी  प्रणाली अंबादास तलमळे (२१) व तेजस्विनी आंबादास तलमले (१९ )अशा दोन  मृतक मुलींचे  नावे आहेत.तर आरोपीच्या मोठ्या मुलीचे नागभीड तालुक्यातील चिखल परसोडी येथे एक वर्षापूर्वी लग्न झालेले आहे.

मुलगा अनिकेत दहावीत गावातील कृषक विदयालाय मौशी येथे शिकत असून तो दहावीचे पेपर देत आहे तर मृतक तेजस्विनी ही सुद्धा कृषक विद्यालय मौशी येथे 12 विचे पेपर देत होती. आरोपी अंबादास  तलमले हा नेहमी दारू पिऊन पत्नी व मुलींना त्रास द्यायचा.दारू पिण्या साठी वारंवार पैश्याची मागणी करायचा. आरोपीच्या पत्नी व दोन्ही मुली मोल मजुरी करायच्या. सदर आरोपी हा गेल्या तीन महिन्यापासून झोपतांना कुऱ्हाड घेऊन झोपत होता.पत्नी व मुलींनी विचारले असता स्वतःच्या रक्षणासाठी घेऊन झोपतो असे उत्तर द्यायचा.

आरोपी गावातील अनेकांशी हुज्जत घालीत असुन १५ दिवसापूर्वी गावातील घरा शेजारीच एका घरी शिरून त्याने टीव्ही फोडल्याची माहिती मिळाली. सदर घटना स्थळी चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांनी भेट दिली.उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात  ठाणेदार विजय राठोड व पोलीस अधिकारी तपास  करीत आहेत.आरोपीला नागभीड पोलीसांनी ताब्यात घेतले असून,मृतकांना  शवविच्छेदनासाठी नागभीडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.