श्री गुरुदेव सेवा मंडळ डोंगरगाव (रेल्वे) येथे ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ५५ वा पुण्यस्मरण सोहळा

✒️ वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.7 डिसेंबर) :- वरोरा तालुक्यातील डोंगरगाव रेल्वे येथे या वर्षी सुद्धा दिनांक २७-११-२०२३ ते ०३-१२-२०२३ पर्यंत विविध रचनात्मक उपक्रमांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५५ वा पुण्यस्मरण सोहळा साजरा करण्यात आला. अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सांगितलेल्या तत्वप्रणाली प्रमाणे श्री गुरुदेव सेवा मंडळ डोंगरगाव (रेल्वे) येथील आयोजक मंडळींनी घेतलेल्या या सात दिवशीय पुण्यस्मरण सोहळ्यामध्ये अनेक नामवंत महाराजांची किर्तन रुपी सेवा गावकऱ्यांना दिली. त्या मध्ये वरोरा येथील पाचगाव चे श्री आशिष महाराज माणूसमारे, प्रशांत महाराज क्षीरसागर, सुनील महाराज लांजुळकर, प्रदीप महाराज चौधरी इ.किर्तन झाले, व अनिरुध्द सूर्तेकर यांचा अभंग गायनाचा कार्यक्रम देखील झाला.

त्यासोबतच गावातील मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांच्यातील असणाऱ्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने विविध स्पर्धा सुध्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, त्यामध्ये सामान्य ज्ञान स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गीतगायन स्पर्धा ह्या यशस्वीरीत्या पार पाडल्या गेल्या, त्या सोबत रक्तदान हेच श्रेष्ठदान हे ब्रीद अनुसरून पहील्यांदाच गावामध्ये रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. त्यात गावातील तब्बल ३५ लोकांनी रक्तदान केले, व आपण खरच राष्ट्रसंतांना अपेक्षित असलेल्या सेवाभावी वृत्तीचे लोकं आहोत हे दाखवून दिले. तसेच गावातील भजन मंडळांचा भजनांचा देखील कार्यक्रम त्यावेळी झाला.

दिनांक ०३-१२-२०२३ ला काल्याच्या निमित्ताने गावातील गुणी जणांचा सत्कार देखील करण्यात आला. त्यात प्रामुख्याने गावातीलच सुपुत्र आर्मी रिटायर्ड श्री हेमराज बेहेरे, गावातील शिक्षक श्री विजय कामटकर, प्रा. श्री प्रफुल आपटे यांचा सत्कार करण्यात आला. व गावातील जुन्या गुरुदेव कार्यकर्त्या चा देखील सत्कार करण्यात आला. तसेच विविध आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये विजय प्राप्त केलेल्या स्पर्धकांना गौरवचिन्ह देऊन बक्षीस वितरण केले. या प्रसंगी व्यासपीठावर गावातील प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

अगदी उत्साहात व आनंदाने हा ५५ वा पुण्यस्मरण सोहळा यशस्वीरीत्या पार पडला. यात आयोजक कमिटीतील अध्यक्ष- श्री रोशन काळे. उपाध्यक्ष- श्री शुभम चिकटे, सचिव- विक्रम बेहरे, कोषाध्यक्ष- प्रदुम मिलमिले, सदस्य- श्री चंद्रभान घुगल, मेघराज काळे, दीपक आपटे, गजानन दरेकर, गिरिधर बेहरे, राकेश काळे, योगेश खिरटकर, शैलेश खिरटकर, प्रतीक सोमालकर, यांनी उपस्थित सर्वांचे या प्रसंगी आभार व्यक्त केले.

तसेच गावातील निष्ठावंत कार्यकर्ते – श्री प्रफुल साळवे, श्री हितेश चंद्रभान घुगल, राहुल काळे, आर्यन मारेकर व इतर कार्यकर्त्यांचे देखील सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभले. ह.भ.प श्री केशव महाराज खिरटकर यांनी या पुण्यस्मरण सोहळ्याच्या आयोजना मागील उद्देश व रूपरेषा उपस्थित सर्व लोकांना समजाऊन सांगितली होती. व हा कार्यक्रम सर्व गावाकऱ्यांच्या सहकार्याने योग्य व यशस्वीरित्या कार्यक्रम पार पडला.