मिनी स्टेडीयम’ चे काम दर्जेदार होण्यासाठी खेळाडूंनी लक्ष द्यावे….पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

Share News

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.1 नोव्हेंबर) : – जिल्ह्यात उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावे, या खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेत चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव वाढवावा यासाठी अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. विसापूर येथील तालुका क्रीडा संकूल हे अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असून बल्लारपूर मध्येही ‘मिनी स्टेडीयम’ चे काम हाती घेण्यात आले आहे. खेळाडूंसाठी होणाऱ्या या स्टेडियमच्या कामाची गुणवत्ता आणि दर्जा उत्तमोत्तम व्हावा यासाठी प्रशासनासोबतच खेळाडूंनीही लक्ष ठेवणे आवश्यक आहे, असे विचार राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

बल्लारपूर शहरातील मिनी स्टेडीयमच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे भुमिपूजन करतांना ते बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हरीष शर्मा, वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, तहसीलदार डॉ. कांचन जगताप, न.प. मुख्याधिकारी विशाल वाघ, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, भाजपा शहर अध्यक्ष काशिनाथ सिंह, समीर केने,मनिष पांडे, नीलेश खरबडे , राजू दारी यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते.

शहरातील खुल्या जागेमध्ये मिनी स्टेडीयम करीता येथील खेळाडूंनी निवेदन दिले होते, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा विकास व सौंदर्यीकरण अंतर्गत येथे संरक्षण भिंतीचे काम हाती घेण्यात आले आहे. सोबतच शौचालय, ॲप्रोच रोड, मुख्य प्रवेश द्वार, खडीकरण रस्ता, पाण्याची टाकी इतरही कामे येथे करण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी 29 लक्ष 95 हजार 172 रुपये मंजूर करण्यात आले असून भविष्यात आणखी निधी देण्यात येईल. मात्र कामाच्या गुणवत्तेवर आणि दर्जावर येथील खेळाडूंनीच लक्ष ठेवणे गरजेचे आहे. सदर काम 3 महिन्यात पूर्ण करण्याच्या सुचना संबंधित विभागाला दिल्या असल्याचे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, बल्लारपूरमधील कुठलेही काम उत्कृष्टच असले पाहिजे. बसस्थानक, पाणी पुरवठा योजना, नाट्यगृह, सैनिक स्कूल, बॉटनिकल गार्डन, पोलिस स्टेशन आदी विकास कामे दर्जेदार असून सिंगापूरचे कौन्सल जनरल यांनी चिठ्ठी लिहून या विकास कामांचे कौतुक केले आहे. आपले गाव, शहर नेहमी समोर राहावे. प्रत्येकच क्षेत्रात आपण अग्रेसर असलो पाहिजे, यासाठी सर्वांनी मिळून विकासात योगदान द्यावे. आज एका छोट्याशा तालुक्याच्या ठिकाणी राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. भविष्यात राष्ट्रीय स्तरावरील आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 

बल्लारपूर विकासात अग्रेसर : बल्लारपूर शहरात तसेच तालुक्यात अनेक विकास कामे करण्यात आली आहे. येथे न्यायालयाची इमारत प्रस्तावित असून 100 बेडेड रुग्णालय तसेच कामगार विमा योजनेअंतर्गत हॉस्पीटलची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. 

स्पोर्ट सेंटरसाठी प्रयत्न : देशात सन 2036 मध्ये ऑलंपिक स्पर्धा घेण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने आपल्याकडे उत्कृष्ट स्टेडीयम आहे. त्यामुळे या परिसरात स्पोर्ट सेंटर उभारण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करण्यात येणार आहे. सैनिक स्कूलमधील फुटबॉल ग्राऊंड आंतरराष्ट्रीय स्तरावरचे असून युरोपियन संघाने या ग्राऊंडला मान्यता दिली आहे. 

परिसरातील नागरिकांचा सत्कार : यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते परिसरातील नागरिकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यात चंद्रशेखर घोडे, राजू कंचर्लावार, अनुप नगराळे, दर्शन मोरे, जगदीश फौजी, अनिल मिश्रा, अजय शर्मा, संकेत भालेराव, किशोर रणदिवे, राहुल ठाकूर, मुरली भाकरे आदींचा समावेश होता.

Share News

More From Author

सर्वसामान्य नागरिक बल्लापूरच्या विकासाचे शिल्पकार.…..पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

राजकीय कार्यकर्तेच बनले रेती चोर,पारोधी नदीतून सर्रास रेतीची चोरी. महसूल विभाग झोपेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *