“दवाखाना आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत वृद्धांची आरोग्य तपासणी Health check up of the elderly under the initiative “dawakhana aaplya dari”

278

🔸 जागतिक दिव्यांग दिन व सामाजिक न्याय पर्वानिमित्त विविध उपक्रम

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर( दि. 13 एप्रिल) :- जागतिक दिव्यांग दिन व सामाजिक न्याय पर्व उपक्रमानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत मातोश्री वृद्धाश्रम, भिवकुंड येथे वृद्ध व्यक्तींची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, वृद्धाश्रमाच्या सदस्य व सामाजिक कार्यकर्त्या डॉ.रजनी हजारे, मातोश्री वृद्धाश्रमाचे सचिव अजय जयस्वाल, बल्लारपूरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, प्राथमिक आरोग्य केंद्र विसापूरच्याच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. आविशा मडावी, डॉ.कांचन आकरे, सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ.आदित्य तिवारी, सामाजिक कार्यकर्ता सोमेश्वर पंदीलवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.  

“दवाखाना आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत सदर शिबिरामध्ये सर्व वृद्धांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्तदाब, शुगर व डोळ्यांची तपासणी तसेच विविध रोगांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. यावेळी, योगासनाविषयी प्रशिक्षण देऊन निरोगी आयुष्य जगण्याकरीता योगाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

या शिबिरामध्ये 37 वृद्धांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये रक्तदाबाचे 10 रुग्ण, ब्लड शुगरचे 5 तर मोतीबिंदूचे 6 रुग्ण आढळून आले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र विसापूर, समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर तसेच मातोश्री वृद्धाश्रम येथील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.