जड वाहनांच्या धडकेत बिबट ठार Leopard killed in collision with heavy vehicles 

558

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

 चंद्रपूर (दि.7 एप्रिल) :- बल्लारपूर ते आष्टी राष्ट्रीय महामार्ग सुरजागड लोहखनिज रात्रंदिवस वाहतुकीमुळे “हायजॅक” झालेला आहे. यामुळे अपघाताच्या संखेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून या अंदाधुंद चालणाऱ्या वाहतुकीमुळे कन्हारगाव अभयारण्यातील वन्यप्राणी व मनुष्य असुरक्षित असुन शुक्रवार दि. ७ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान वाहनाच्या धडकेत झरण (कोठारी) जवळ बिबट मृत झाल्याची घटना घडल्याने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.

         कन्हारगाव अभयारण्याच्या मध्य भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील कोठारी पासून सहा किमी अंतरावर झरण गावाजवळ महामार्ग ओलांडताना वाहनाची धडक बसल्याने बिबट गंभीर जखमी झाला.सदर वाहन लोहखनिज वाहतूक करणारे असल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.

घटनेची माहिती वनविकास महामंडळाचे वनाधिकारी सुधाकर राठोड यांना समजताच वनकर्मचाऱ्यांसह घटनास्थळी हजर झाले.जखमी झालेल्या बिबटास तात्काळ चंद्रपूर येथील व्याघ्र उपचार केंद्रात नेत असता वाटेतच बिबटाचा मृत्यू झाला. बल्लारपूर – आष्टी राष्ट्रीय महामार्गावर सुरजागड लोहखनिजाची वाहतूक वाढलेली असल्याने दैनंदिन अपघात सातत्याने घडत आहेत.

अभयारण्याच्या अंतर्गत महामार्गाने वाहतूकीची वर्दळ आणि अनियंत्रित वाहना मुळे मानवासह वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे.यापूर्वी भटारी फाट्यावर वाहनांच्या धडकेत बिबट मृत्यू झाला तसेच या मार्गावर या पूर्वीही हरीण,चितळ,अस्वल,रानटी डुक्कर आदी अनेक प्राण्यांचा अपघाताने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.तसेच दुचाकी,चारचाकी आदींचे अपघात नित्याची बाब बनली आहे.