कर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान 

Share News

✒️वरोरा (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.1 फेब्रुवारी) :- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात जवळपास १५०० शेतकऱ्यांना देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे सरकारने कर्जमाफी दिली नाही व जवळपास २००० शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन राशी दिली नाही त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे व जिल्हा सचिव विनोद सोनटक्के यांच्या नेत्रुत्वात शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी स्थानिक वरोरा तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदने देण्यात आली.

परंतु दोन महिन्यांपासून पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा प्रशासनाला जाग आली नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शेतकरी कर्जमाफी योजना व अतिवृष्टी आणि ओला दुष्काळ अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांसाठी नोंदणी अभियान वरोरा येथील मनसे महिला तालुका अध्यक्षा रेवतीताई इंगोले यांच्या तहसील कार्यालयाजवळ असणाऱ्या “रेवती झेरॉक्स” सेंटर वर राबविण्यास दिनांक १ फेब्रुवारीला सुरुवात झाली असून या अभियानाचे उद्घाटन वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे व जिल्हा सचिव विनोद सोनटक्के यांनी केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मागील अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व अतिवृष्टीच्या अनुदानासाठी शासन प्रशासनाला निवेदने व एक दिवशीय ठिय्या आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली होती परंतु शासन प्रशासनाकडे पात्र लाभार्थी यांची यादी नसल्याची सबब पुढे करून संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची कर्जमाफी त्यांना प्रोत्साहन राशी देण्यात अडचण येत असल्याची माहिती होती सोबतच अतिवृष्टीचे अनुदान सुद्धा देण्यास तहसील प्रशासन निर्णय घेत नव्हते त्यांमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कर्जमाफी, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन राशी पासून वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून मनसे तर्फे नोंदणी अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे.

सदर शेतकऱ्यांकडून नोंदणी करून या संदर्भात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन प्रशासनाकडे पाठपुरावा करून जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरासमोर व त्यानंतर मुंबई मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव विनोद सोनटक्के यांनी दिली आहे, यावेळी मनसे तालुका उपाध्यक्ष राम पाचभाई, विभाग अध्यक्ष राजेंद्र धाबेकर, मनसे महिला सेना तालुका अध्यक्षा रेवती इंगोले व असंख्य शेतकरी उपस्थित होते.

Share News

More From Author

चारगाव बू. येथे श्री संत भोजाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

चितळाची शिकार प्रकरणी मुद्देमालासह एक आरोपीला अटक दोन फरार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *