८८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविम्याचे ८० कोटी जमा

🔸भाजपा किसान मोर्चाचे आंदोलनाला यश

✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.11 जुलै) :- खरीप हंगामाच्या सुरूवातीलाच शेतकरी बांधवांसाठी शासनाकडून खुशखबर आहे. रब्बी हंगामात झालेल्या नुकसानीपोटी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ८८,२१६ शेतकऱ्यांच्या खात्यात ८० कोटी १८ लाख ७८ हजार रुपये जमा झाले आहेत.

राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अविरत प्रयत्नाने व चंद्रपूर जिल्हा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बंडू गौरकर यांच्या नेतृत्वात भाजपाने कृषी कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे. गतवर्षीच्या खरीप व रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले होते. आता या नुकसानीची भरपाई विमा स्वरूपात मिळू लागल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या खरीप व रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले होते. या झालेल्या नुकसानीचा पीकविमा शेतकऱ्यांना मिळावा म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने प्रयत्न केले. जिल्ह्यातील ३ लाख ४१ हजार २३३ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. यातून ३,००,५३४ हेक्टर क्षेत्र संरक्षित केले होते. यातील १ लक्ष ४३ हजार ९९१ शेतकरी विम्यासाठी पात्र ठरले असून १९१ कोटी ४९ लक्ष ७८ हजार रूपये पीकविमा स्वरूपात शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आला. आतापर्यंत ८८,२१६ शेतकऱ्यांच्या खात्यात ८० कोटी १८ लाख ७८

हजार रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्याची कारवाई सुरू असल्याचे कृषी अधीक्षकांनी सांगितले.

केंद्र सरकारची पंतप्रधान पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असून राज्य सरकारने हा पीक विमा केवळ एक रुपयात शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेला मागील वर्षी प्रचंड प्रतिसाद दिला. अतिवृष्टी, नैसर्गिक हानी झाल्यास शेतकऱ्यांना एकप्रकारे पंतप्रधान पीक विमा योजनेचे कवच प्राप्त झाले आहेत.

चालू वर्षात पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रतिसाद देण्यात येत नसून आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ५५ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा नोंदणी केली आहे.

आता केवळ सहा दिवस उरले असून यंदा पीकविमा नोंदणी करण्याची १५ जुलै शेवटची तारीख आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना पत्राद्वारे त्वरित पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना आव्हान करण्यात यावे, अशी सूचना पत्राद्वारे करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली आहे.