✒️सारंग महाजन बुलढाणा (Buldhana प्रतिनिधी)
बुलढाणा(दि.28 ऑगस्ट) :-
श्रीकृष्ण संगीत विद्यालयाचे संस्थापक व महाराष्ट्रातील नामवंत शास्त्रीय भजन गायक ह.भ.प.भिमराव शास्त्री पवार यांना पंडीत विष्णु दिगंबर पलूस्कर संगीत कला गौरव पुरस्कार दि.२४.८.२०२४ला विष्णुदास भावे नाट्यगृह मुंबई येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
पंडीत विष्णु दिगंबर पलूस्कर यांच्या १५१व्या जयंती निमित्त अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने शास्त्रीय संगीत गायन क्षेत्रात अमुल्य योगदान,त्याचबरोबर संगीताचा प्रचार व प्रसार करून हजारो शिष्य उत्तम पद्धतीने तयार केले त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार श्री प्रा. डाॅ. जोगेंद्रसिंह बिसेन प्र. कुलगुरू यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नासिक व अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ अध्यक्ष श्री बाळासाहेब सुर्यवंशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
शास्त्रीबुवांचा जन्म ८.८१९५६ रोजीअत्यंत दुर्गम व खेडे असणार्या कवठळ गावात झाला. आईवडीलांची हलाखीची परिस्थिती व कोणतेही वातावरण नाही.अशा स्थितीत संगीताची जन्मजात आवड होती. जिथे रस्तेच नाहीत तिथे शिक्षणाची आणि त्यातही संगीत शिक्षणाची गंगा कशी पोचणार. परंतू बालपणापासून जिद्दी व मेहनती असणार्या भिमराव यांनी माधुकरी मागून जालना येथे एकनाथ सानप यांचेकडे संगीताचे शिक्षण घेतले. वारकरी भजन अंध असणार्या गुरूवर्य नारायणबुवा घुबे यांचेकडून शिकले हिवरा आश्रम येथे राम कोठेकर सरांकडे शास्त्रीय संगीताचे धडे व तिथेच ते संगीत विशारद झाले.
हिवरा आश्रम येथेच संगीत शिक्षक म्हणून काम केले.प.पु. शुकदास महाराजांकडे सेवा दिली.आश्रमामधे शास्त्रीय संगीताची सेवा करत असतांना प.पु.शुकदास महाराजांनी त्यांना शास्त्री ही पदवी प्रदान केली.
शास्त्रीजींनी १९९१साली चिखली शहरात श्रीकृष्ण संगीत विद्यालयाची स्थापना केली. आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी येथे संगीताचे धडे घेतले. महाराष्ट्रभर त्यांच्या काकडा भजनाने त्यांची वेगळी ओळख निर्माण केली आहे.दुरदर्शन आकाशवाणी वर स्वरधारा, सुगम संगीत,राम रंगी रंगले हे कार्यक्रम त्यांचे प्रसारीत झाले आहेत.संगीताच्या प्रवासात शास्त्रीय गायन,किर्तनचाली,भजन अविरत व अखंडपणे चालू आहे.
संगीत वैभवाचं दान,वैष्णवाचं वाण” अशी ओळख असणारे व बुलडाण्याच्या मातीत जन्म घेऊन या मातीचा लौकीक वाढवणार्या भिमराव शास्त्री पवार यांचा हा सन्मान म्हणजे वारकरी सांप्रदायाचा व आध्यात्मिक क्षेत्राचा सन्मान आहे. असे गौरवोदगार ह.भ.प. प्रकाशबुवा जंजाळ अध्यक्ष वारकरी महामंडळ यांनी काढले आहेत.त्यांच्या संगीत क्षेत्रातील तपश्चर्येच हे फलीत असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमधे आनंदाच वातावरण आहे. सर्व क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.