🔹तांडा सुधार समितीचे अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन
🔸Tanda Reform committee’s food donation movement for food Donors
✒️गजानन लांडगे महागाव (Yavatmal प्रतिनिधी)
यवतमाळ (दि.21 मार्च) :- जिल्ह्यातील पुसद तालुक्यात गेल्या सदतीस वर्षापूर्वी साहेबराव करपे यांच्या संपूर्ण शेतकरी कुटुंबाने आपली जीवन यात्रा संपवली होती. त्यामुळे साहेबराव करपे यांनी ज्यादिवशी आत्महत्या केली त्या दिवशी “अन्नदात्यासाठी अन्नत्याग” म्हणून आत्मक्लेश आंदोलन केल्या जाते.
अखिल भारतीय तांडा सुधार समिती या सामाजिक संघटनेच्या वतीने यवतमाळ जिल्ह्याचे कार्याध्यक्ष संजय मदन आडे यांनी हिवळणी तलाव येथे आज १९ मार्च रोजी एकदिवसीय आत्मक्लेश आंदोलन केले. १९ मार्च १९८६ ला साहेबराव, मालती व विश्रांती (मुलगी), मंगला (मुलगी), सारिका (मुलगी), भगवान नावाचा मुलगा यात्रेच्या नावाखाली वर्धा जिल्ह्यातील दत्तपूर आश्रमात गेले. बिचारा भगवान त्याच्या मावशीकडे होता. त्यालाही उद्या परत येवू असे साहेबराव यांनी सांगून सोबत घेतले. पत्नी व चार लेकरांना बापाचे मनसुबे माहित नव्हते. साहेबरावाने झिंक फॉस्फेट व डेमॉक्रॉन ही घातक रसायणे सोबत घेतली होती. दत्तपूर आश्रमात ते पोहोचले तेव्हा साहेबराव अस्वस्थच होता.
तिथे गेल्यावर त्याने झिंक फॉस्फेट लावलेली भजी विश्रांती, मंगला व सारिकाला खावू घातली. भगवानला डेमॉक्रॉन पाजले. भगवानचा जीव जात नव्हता तर त्याच्या अंगावर घोंगडे टाकून नारळाच्या दोरीने त्याला संपवले. चार मुलांचा जीव गेल्यानंतर मालतीला व नंतर स्वतःला साहेबरावाने संपवले, तत्पूर्वी त्याने पाचही जणांच्या कपाळावर एक रुपयाचे कलदार (नाणे) ठेवले. स्वतःला संपविण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली. या चिठ्ठीत त्याने आपली वेदना व्यक्त केली आहे.
स्वतःला मृत्यूच्या स्वाधीन करण्यापूर्वी संगीतप्रेमी साहेबराव करपे यांनी ‘येऊ दे दया आता तरी गुरुमाऊली’, या आयुष्याची दोरी कमी जाहली” हे भजन म्हटले. १९ मार्च १९८६ ला रात्री १२ वा. ४५ मिनिटांनी हे थरारनाट्य संपले. दुसऱ्या दिवशी या सामुहिक आत्महत्याकांडाने अख्खा महाराष्ट्र हादरला. चिलगव्हाण दोन दिवस मूक आक्रंदन करीत होता. सहा प्रेते जवळजवळ ठेवण्यात आली अन हजारो लोकांच्या साक्षीनं हे कुटुंब अग्नीच्या स्वाधीन होत काळाच्या उदरात गडप झालं.
सन 2017 पासून ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ हे आंदोलन शेतकरी नेते श्री.अमर हबीब यांच्या प्रेरणेतून सुरू झाले व आज ते जगभर पसरले आहे. नेतृत्वात राज्यभर करण्यांत येते. अभिषेक शिवाल या संवेदनशील तरुणाचा या विषयावरील माहितीपट सुद्धा बर्लिन महोत्सवात पोहोचला. वकीलीचे शिक्षण घ्यायला गेलेले दीपक चटप लंडन येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर बसून उपवास करणार आहे.
आजही रोज तीसचे वर शेतकरी आत्महत्या करतात. कृषीप्रधान देश म्हणून मिरवताना शेती आणि शेतकरी यांना कोणत्याही पक्षानं, कोणत्याही मुख्यमंत्र्यानं आणि कोणत्याही सत्तेनं कधीच हात दिला नाही. मदतीच्या घोषणा, कर्जाची नाटकं आणि नुकसानभरपाईची आणेवारी यांचं राकारणच केलं गेलं. आता तर मोर्चेकरी शेतकऱ्यांच्या तळपायाला आलेल्या फोडांचही राजकारण होत आहे.
वेदना पेरा, दुःख उगवा आणि उपेक्षाचं पीक काढा ही अवहेलनेची साखळी 37 वर्षे न चुकता सुरू आहे. मृत्यूचा हा क्रूर उत्सव थांबला पाहिजे म्हणून अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या वतीने संजय आडे दरवर्षी हे अन्नत्याग आंदोलन करतात. संजय आडे यांचे आजचे अन्नत्याग आंदोलन त्यांच्या मुली रिद्धी व सिद्धी ह्यांनी निंबू पाणी पाजून सोडविले