🔹ट्रस्टतर्फे सुरू असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा लाभ घ्यावा : रविंद्र शिंदे
✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadrwati प्रतिनिधी)
भद्रावती (दि.11 जून) : – स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर तर्फे ‘एपीजे अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना’ अंतर्गत तालुक्यातील चालबर्डी (रै.) येथील एका विद्यार्थिनीला शिक्षणाकरिता आर्थिक सहकार्य करण्यात आले.
भद्रावती तालुक्यातील चालबर्डी (रै.) येथील सौ. संध्या प्रदीप राऊत या भूमिहीन असून मोलमजुरी करतात. यांची मुलगी कु. कन्यका प्रदीप राऊत बारावी उत्तीर्ण झाली आहे. पुढील शिक्षण घेवून तिला पीएसआय बनायचे आहे, त्याकरीता नाशिक येथील अश्वमेध करीयर अकॅडमी येथे प्रवेश घेवून प्रशिक्षण घ्यायचे आहे. त्यासाठी तिला आर्थिक मदतीची गरज असल्याचे पत्र आई सौ. संध्या प्रदीप राऊत यांनी ट्रस्टला दिले. त्यानुसार कु. कन्यका प्रदीप राऊत हिला प्रशिक्षणाकरीता आज (दि. ११) ला रविंद्र शिंदे यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली.
राऊत कुटुंबाची जेमतेम परिस्थिती असल्याने त्याला पुढील शिक्षणाकरीता आर्थिक सहकार्य हवे होते. सौ. संध्या प्रदीप राऊत यांना स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या योजनांविषयी माहिती झाली. त्यांनी ट्रस्ट कडे मदतीची मागणी केली व ट्रस्टने कसलाही विलंब न लावता त्याला आर्थिक सहकार्य केले.
यावेळी ट्रस्टचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे, कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, सदस्या सुषमाताई शिंदे, संजय तोगट्टीवार उपस्थित होते.
‘एपीजे अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना’ अंतर्गत यापूर्वी अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य करण्यात आले आहे.
ट्रस्ट तर्फे विविध समाज उपयोगी अभियान राबविल्या जात असून गरजूंनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे संस्थापक अध्यक्ष रविंद्र शिंदे म्हणाले.