सोयाबीन अष्टसूत्रीचा अवलंब करुन उत्पादनात वाढ करावी

🔹मा.जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्याकडून आवाहन

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू.(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.3 जून) :- यावर्षी खरिप हंगामामध्ये सोयाबीन पेरणी करतांना अष्टसूत्री चा वापर सर्व शेतकरी बांधवांनी करावा व आपले उत्पादनात हमखास वाढ करावी,असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी पिपालगाव येथील सोयाबीन कार्यशाळेत केले.

आगामी खरीप हंगाम नियोजनासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत उपविभागीय कृषी अधिकारी, वरोरा यांचे मार्फत विपश्यना केंद्र, गुजगव्हाण येथे विभागीय कृषी सहसंचालक नागपूर तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर शंकर तोटावार, उपविभागीय कृषी अधिकारी तथा तालुका कृषी अधिकारी वरोरा सुशांत लव्हटे, तालुका कृषी अधिकारी चिमूर ज्ञानदेव तिखे, तालुका कृषी अधिकारी 

भद्रावती मोहिनी जाधव यांचे प्रमुख उपस्थितीत सोयाबीन कार्यशाळा दिनांक 2 जून 2024 रोजी संपन्न झाली. कार्यशाळेचे प्रास्ताविक करतांना उपविभागीय कृषी अधिकारी तथा तालुका कृषी अधिकारी, वरोरा सुशांत लव्हटे यांनी मागील वर्षी सोयाबीन पिकामध्ये कीड रोग व बुरशीच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे नुकसान झाले.

त्यादृष्टीने यावर्षी सोयाबीन पिकाची योग्य पद्धतीने व योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून लागवड व पीक व्यवस्थापन होणे गरजेचे असल्यामुळे सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे प्रास्ताविकात म्हटले. त्यासोबतच विविध पिकांमध्ये रस शोषक कीडींच्या व्यवस्थापणासाठी चरुर (घा.), ता. भद्रावती येथील महिला गटाने सक्षम या नावाने तयार केलेल्या चिकट सापळ्यांचा वापर करण्याचे आवाहन देखील या निमित्याने करण्यात आले. कार्यशाळेस मार्गदर्शन करतांना विभागीय कृषी सहसंचालक नागपूर विभाग नागपूर तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर शंकर तोटावार यांनी सोयाबीन पिकाचे उत्पादन वाढीच्या दृष्टीने सोयाबीन पिकातील अष्टसूत्री चे सविस्तर महत्व समजावून सांगितले.

सोयाबीन पेरणीपूर्वी बियाणे प्रतवारी, बियाणे उगवन शक्ती तपासणीच्या घरगुती पद्धती, बीज प्रक्रिया करूनच पेरणी करणे, दहा वर्षाच्या आतील प्रसारित झालेल्या सुधारीत वाणांचा वापर करणे, बीज प्रक्रिया, बियाण्याची योग्य अंतरावर व खोलीमध्ये बीबीएफ च्या सहाय्याने, रुंद सरी वरंबा पद्धतीने, टोकन यंत्राच्या सहाय्याने पेरणी करणे, पेरणीची पद्धत व प्रति एकर वापरावयाची बियाणे मात्रा त्यासोबतच तुर पिक आंतर पद्धतीने घेणे, रासायनिक खताचे प्रति एकर मात्रा व विविध खतांचा संतुलित वापर, जमिनीची सेंद्रिय कर्ब व प्रति ग्राम जिवाणूंची उपलब्धता लक्षात घेता शक्यतो तणनाशकाचा वापर टाळून भौतिक तसेच मशागतीय पद्धतीने तण नियंत्रण करणे, पिकामध्ये तणनाशकाचा वापर कमीत कमी करणे, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्याकरिता कंपोस्ट खत, चांगले कुजलेले शेणखत यासारख्या सेंद्रिय व जैविक निविष्ठांचा वापर करणे, त्यासोबतच पीक लागवडीवरील खर्च कमी करण्याच्या दृष्टीने आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याबाबत सादरीकरणाद्वारे तांत्रिक मार्गदर्शन केले.

मागील वर्षी सोयाबीन पिकावर बुरशीच्या झालेल्या प्रादुर्भावामुळे पिकाचे अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या प्रादुर्भावाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाचा योग्य वापर करण्याचा सल्ला दिला. सोयाबीन लागवड तंत्रज्ञानाची अचूक माहिती शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रक्षेत्रावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे बीबीएफ द्वारे पेरणी, रुंद सरी वरंब्यावर टोकण पध्द्तीने लागवड, साधे पेरणीयंत्रामध्ये सुधारणा करून पेरणी, बैल चलीत पेरणी यंत्राद्वारे पेरणीची पद्धत यासारख्या विविध तंत्रज्ञानाची माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विशाल घागी व उपस्थितांचे आभार मंडळ कृषी अधिकारी विजय काळे यांनी मानले. कार्यक्रमाला कृषी विभागाचे वरोरा, चिमूर व भद्रावती येथील अधिकारी व कर्मचारी तसेच विदर्भ सेंद्रिय शेती उत्पादक बचत गट अकोला ता:- वरोरा यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमास वरील तालुक्यातील जवळपास 300 ते 350 शेतकरी उपस्थित होते.