🔸जिल्हा परिषदच्या शिक्षकांचा नाविन्यपूर्ण उपक्रमI(nnovative initiative of Zilla Parishad teachers)
वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा( दि. 2 मे ) : –
उन्हाळ्याच्या सुट्टीत सुद्धा विद्यार्थ्यांनी विविध कृतीशील उपक्रमात सहभाग घेऊन स्वतःचा सर्वांगीण विकास करावा या दृष्टीकोनातून वरोरा पंचायत समितीतील जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमशील शिक्षकांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी 15 दिवसीय निःशुल्क समर कॅम्पचे आयोजन केले होते. या कॅम्पचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोर्डा येथे दिनांक 15 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान करण्यात आले होते. या कॅम्पमध्ये 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी विविध कृतिशील उपक्रमांमध्ये सहभाग घेतला होता.
या समर कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना नृत्यकलेचे व समूह नृत्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच स्पोकन इंग्लिशचे वर्ग भरवण्यात आले होते. विद्यार्थ्यांना कलेची आवड निर्माण करण्यासाठी रंगकामाचे व चित्रकलेचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच विविध मनोरंजनात्मक खेळांमधून विद्यार्थ्यांमध्ये जीवनमूल्ये रुजवण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये स्टेज डेअरिंग निर्माण करण्यासाठी संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच या कॅम्पमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात इनडोअर गेम्स, आऊटडोअर गेम्स ,ग्रुप डान्स, योगा डान्स उपक्रम सुद्धा राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी क्राफ्टच्या तासिकेदरम्यान नवनिर्मितीचा आनंद लुटला. यामध्ये हँगिंग रिंग्स, रिबन वर्क, पेपर क्राफ्ट, कागदी ससे, कागदी टोप्या, थंब पेंटिंग, संकल्पचित्र, कोलाज काम, आईस्क्रीम स्टिक आर्ट, कागदी पर्स, कागदी पाने, कागदी फुले, कागदी पक्षी बनवण्याचे प्रशिक्षण घेतले.
विद्यार्थ्यांनी लेझीमचा मनमुराद आनंद घेतला. तसेच यामध्ये स्टोरी टेलिंगचे कौशल्य विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले. विद्यार्थ्यांना ग्रीटिंग बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच हसत खेळत विज्ञानाचे वर्ग भरवण्यात आले.
शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी योगासने व प्राणायम चे प्रशिक्षण देण्यात आले, विद्यार्थ्यांकडून विविध मनोहारी मनोरे करवून घेण्यात आले. तसेच विविध मान्यवरांचे मार्गदर्शनाचे सत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप गोडशेलवार , शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच गटशिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर चहारे , केंद्रप्रमुख रामभाऊ दुमोरे , बोर्डा ग्रामपंचायतच्या सरपंच ऐश्वर्या खामनकर यांनी सुद्धा सहभाग घेतला..
अशा आगळ्यावेगळ्या नाविन्यपूर्ण समर कॅम्पचा समारोप 30 एप्रिल रोजी करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध प्रकारच्या क्राफ्टचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या दरम्यान विद्यार्थ्यांनी स्वतः चे कॅम्पविषयी मनोगत व्यक्त केले. पालकवर्गाने सुद्धा आपल्या प्रतिक्रिया दिल्या .उत्कृष्ट विद्यार्थ्यांना तसेच सहभागी सर्वच विद्यार्थांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
हा समर कॅम्प यशस्वी करण्यासाठी विजया शेंडे, श्वेता लांडे, स्वाती खराबे, स्नेहल खिरटकर, सुचिता कुळे, दिप्ती चौखे, सपना बोम्मावर, पूजा कुंटेवार, मनीषा नन्नावरे, दिपीका चिडे, मोना आखाडे, अर्चना महाकारकर, प्रदीप ढोके, संदिप चौधरी, अविनाश चिडे, प्रमोद तुराणकर , जगदीश वाघ, अनुप माथनकर, संदिप निर , सोनल येनगंदलवार या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी मेहनत घेतली.