✒️संतोष लांडे पुणे (Pune प्रतीनिधी)
पुणे (दि.27 जून) :-
समतावादी चळवळीतील कार्यकर्ते तसेच मैत्री प्रकाशनचे प्रमुख दयानंद कनकदंडे यांनी फ्लॅटच्या बाल्कनीतून उडी मारून जीवन संपविले. ही घटना मंगळवारी रात्री दि. २५ रात्री नऊच्या सुमारास दिघी येथे घडली. त्याच्या अचानक जाण्याने चळवळीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. तर काहींनी हा घातपात असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दयानंद कनकदंडे हे समतावादी चळवळीतील सक्रिय सदस्य होते. दिघी येथील एका सोसायटीत ते राहात होते. दरम्यान मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास त्यांनी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपविले. त्यांच्या मागे पत्नी , आई , वडील असा परिवार आहे.
दयानंद यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. काहींनी दयानंद यांच्या जाण्याने चळवळीची मोठी हानी झाल्याचे म्हंटले आहे. तर काही सहकाऱ्यांनी त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे.
याबाबत दिघीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, घटनास्थळी केलेल्या पाहणीनंतर प्रथमदर्शनी दयानंद यांनी आपले जीवन संपवल्याचे दिसून येत आहे. मात्र तरीही सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरु असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.