🔸उद्यापासून होणार आमरण उपोषण, जवळपास दीड कोटी रुपयांच्या ठेवी संचालक मंडळाने अडकल्या
✒️परमानंद तिराणिक वरोरा (Warora प्रतिनिधी)
वरोरा (दि.21 मार्च ) :-नेहरू चौक वरोरा येथे कार्यरत श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेतील १००० पेक्षा जास्त ठेवीदार व ग्राहक यांचे जवळपास १ करोड ५० लक्ष रुपयापेक्षा जास्त रक्कमेच्या ठेवी पतसंस्थेचे अध्यक्ष, सचिव व इतर संचालक यांनी अफरातफर करून पतसंस्था दिवाळखोरीत काढल्यामुळे जनआक्रोश संघटनेचे अध्यक्ष अँड अमोल बावणे व राजू कुकडे यांच्या नेत्रुत्वात आजपासून (मंगळवार) ठेवीदारांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले असून उद्यापासून आमरण उपोषण सुरू होणार असल्याची माहिती आंदोलन करणाऱ्या ठेवीदारांनी केली आहे.
या पतसंस्थेच्या एजंट व ग्राहक यांनी पतसंस्थेचे संचालक मंडळ व कर्मचारी यांचे विरोधात सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तालुका वरोरा या कार्यालयाला दिनांक १५/०७/२०२१ रोजी तक्रार दाखल केल्या व त्यानंतर व संबधीत कार्यालयात विविध ग्राहका कडून व संघटने मार्फत तक्रार दाखल केल्या परंतु सदर सहाय्यक निबंधक येथील सबंधित अधिकारी कर्मचारी हे पतसंस्थेचा भ्रष्टाचार लपविण्याकरीता संचालकांची पाठराखन करीत आहे. या प्रकरणात वारंवार तक्रार दिल्या नंतरही कार्यालय कडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याने ठेवीदार आक्रमक होऊन
यापूर्वी दि १९ / ११ / २०२१ रोजी ग्राहकांनी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. तेव्हा पासुन सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून पतसंस्थेवर प्रशासक नियुक्ती करण्यात आली. प्रशासक नेमणूक केल्यानंतर सुध्दा आजपावेतो प्रशासना कडून कोणतेही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही.
सदर ठेवीदारांना प्रशासक नियुक्तीच्या वेळी १ महिण्याच्या आते ठेवीदाराची रक्कम मिळवून देणार अन्यथा संबंधीत संचालक मंडळावर ठोस कार्यवाही करणार अशी हमी दिली होती परंतू ग्राहकांनी तक्रार दिलेल्या दिनांका पासुन २ वर्षाचा कालावधी लोटूनही आजपावेतो याप्रकरणात ग्राहक व ठेवीदार यांची रक्कम देण्यात आली नाही. संबधीत संचालक मंडळ यांचेवर कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही.
सहाय्यक निबंधक कार्यालयात श्री सिद्धीविनायक नागरी सहकारी पतसंस्थेच्या विरोधात विविध तक्रारी ग्राहकाकडून करण्यात आल्या त्यामुळे संस्थेचे सन २०२० ते २०२१ या कालावधीचे लेखापरिक्षण श्री ऐ. के. माटे, लेखापरिक्षक श्रेणी – २. सहकारी संस्था वरोरा यांनी केले. आता ते ऑडीट खोटे व बनावटीचे दिसुन आले. श्री. माटे यांनी संस्थेचा आर्थिक घोटाळा लपविण्याकरीता व संचालक मंडळ यांना वाचविण्या करीता संचालक मंडळाकडून पैसे घेऊन लेखापरीक्षण तयार केला असल्याचे असे दिसुन येते.
सदर प्रकरणात ग्राहकांनी वरील अधिकारी व कार्यालयाला वारवार तक्रारी केल्यानंतर सदर प्रकरणात सहकार खाते (लेखा परिक्षक विभाग) जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग १ सहकारी संस्था चंद्रपूरचे (सांजन किसन साखरे) लेखा परिक्षक श्रेणी १ सहकारी संस्था चंद्रपूर यांचे कडून सन २०१६-१७ ते २०२०-२१ या वर्षांचे फेर लेखापरिक्षण अहवाला वरील प्रशासकीय अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनिय १९६० व त्या खालील नियम १९६२ चे कलम ६० अन्वये गुतवणूक करण्यात संचालक मंडळाने कसूर केला आहे. असे नमूद आहे.
संचालक मंडळ व कर्मचारी यांनी आपले नातेवाईक व मित्र परिवार यांना चुकीचे निर्णय घेऊन कर्जासाठी ठेवीदारांच्या निधीचा उपयोग केला आहे. या आर्थिक घोटाळ्याबाबत तत्कालीन संचालक मंडळ कर्मचारी जबाबदार असून यांचेवर कायदेशिर चौकशी करण्यात यावी असे स्पष्ट नमुद असताना सुध्दा आज पावेतो संबंधित अधिकारी संचालक मंडळाकडून मिळणान्या आर्थिक लाभापोटी कारवाई केलेली नाही असे स्पष्ट दिसून येत आहे.
लेखापरिक्षक साजन किसन साखरे यांनी सुध्दा पुर्ण लेखापरिक्षन अहवालामध्ये संचालक मंडळ यांचे कडून आर्थिक लोभापोटी पतसंस्थेची आर्थिक घोटाळ्याची खरी माहीती न नमूद करता ती लपवून बनवनवीचा अहवाल तयार करून दिला. श्री साखरे यांनी २ महीन्यांच्या आत अहवाल तयार करण्याचा आदेश असताना सुध्दा बुध्दीपुरस्कृतपणे ६ महिण्यांपेक्षा जास्त कालावधी घेऊन बनावटी लेखापरिक्षन अहवाल सादर केलेला आहे.
सदर पतसंस्थेत गोरगरीब-मजूर व छोटे दुकानदार यांच्या ठेवी व दैनिक बचत ठेव हि पतसंस्थेच्या संचालक मंडळानी गहाळ केले आहे व ठेवीदारांच्या ठेवीची मुदत संपून सुध्दा ठेवी परत करण्यात आलेल्या नाही. काही ग्राहकांनी आपल्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी व विवाह कार्यक्रम व आजारावर उपचारासाठी रक्कम म्हणून ठेवी ठेवलेल्या होत्या.
त्या ठेवीची रक्कम वेळेवर न मिळाल्यामुळे ग्राहकाला खुप आर्थिक व मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. सदर पतसंस्थेचे सर्वाधिक ग्राहक हे ग्रामिण भागातील ठेवीदार ग्राहक आहे. यात महीला मजूर शेतकरी छोटे व्यवसायीक असे ग्राहक आहे. ग्राहकांना त्यांची रक्कम न मिळाल्यामुळे ग्राहकांना खुप मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे सिद्धिविनायक संस्थेचे संचालक मंडळ, कर्मचारी व लेखापरिक्षक ऐ. के. माटे व इतर दोषी अधिकारी वर M.P.I.D. कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अन्यथा ठेवीदार न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण करेल असा इशारा अँड अमोल बावणे, राजू कुकडे, गुणवंत खिरटकर. पुरुषोत्तम पावडे, संजय घटे व इतर ठेवीदारांनी दिला आहे,