▫️हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त व बस सेवा सुरू करण्याची मागणी(Demand to start bus service and control of ferocious animals)
✒️ मनोज कसारे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)
भद्रावती(दि.18 ऑगस्ट) :- तालुक्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्रप्रकल्पा लगत असलेल्या मौजा चिचोली गावाजवळील चोरा सफारी प्रवेशद्वारापासून चिचोली गावापर्यंत जंगली हिंस्र प्राण्यांपासून बचावासाठी लोखंडी जाळीचे कुंपण करण्यात यावे या आशयाचे निवेदन भद्रावती वनपरिक्षेत्र अधिकारी एच.पी. शेंडे यांना तर शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांसाठी नियमित बस सेवा सुरू करावी या आशयाचे निवेदन चंद्रपूर आगाराचे विभागीय नियंत्रण यांना देण्यात आले.
गाव तिथे शाखा या अभियानांतर्गत शिवसेना (उ.बा.ठा.) या पक्षाची चिचोली गावात भद्रावती वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात तसेच शिवसेना तालुकाप्रमुख नंदू पढाल यांच्या नेतृत्वात व श्री राहुल मालेकर युवा सेना तालुकाप्रमुख भद्रावती, श्री घनश्याम आस्वले शहर प्रमुख भद्रावती आणि श्री विलास जीवतोडे उपसरपंच चोरा यांच्या उपस्थितीत आढावा बैठक चिचोली येथे पार पडली.
या बैठकीत गावातील प्रमुख समस्या म्हणून चिचोली या गावातील गेल्या १५ वर्षापासून बंद असलेली बस सेवा राज्य परिवहन मंडळाने त्वरित सुरू करण्यात यावी. तसेच चोरा सफारी गेट पासून चिचोली गावापर्यंत ग्रामस्थांना वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी अर्धवट असलेले लोखंडी जाळीचे संरक्षण कुंपण वनविभागाकडून त्वरित करण्यात यावे.
एकीकडे वाघाची व अन्य हिंस्र वन्य प्राण्यांची भीती तर दुसरीकडे चिचोली हे गाव तालुक्याच्या एका टोकाला असल्याने संपूर्ण ताडोबा जंगलांनी वेढले आहे. त्यामुळे या गावातून ये-जा करण्याकरिता कोणतेच वाहतुकीचे साधन उपलब्ध नसल्याने या गावातील विद्यार्थी व ग्रामस्थांना शैक्षणिक व इतर कामासाठी पायदळ किंवा स्वतःच्या दुचाकी वाहनांनी ये-जा करावी लागते.
ज्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या समस्या त्वरित सोडवण्यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख तथा नगरसेवक नंदू पढाल यांच्या नेतृत्व व राहुल मालेकर युवा सेना तालुकाप्रमुख यांच्या उपस्थित वनविभाग भद्रावती व विभागीय नियंत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग विभागीय महामंडळ चंद्रपूर यांना निवेदन देऊन या समस्या त्वरित सोडविण्यात याव्यात अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.
संबंधित अधिकाऱ्यांनी सुद्धा समस्याचे गांभीर्य लक्षात घेता स्वतः लक्ष देऊन ग्रामस्थांना न्याय देण्याचे आश्वासन दिले.याप्रसंगी शहर प्रमुख घनश्याम आस्वले, चिचोली गावचे उपसरपंच महेश सागोरे, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य मनोहर श्रीरामे, ग्रामपंचायत सदस्य शेखर ईखारे, रमेश जांभुळे, बालाजी दोडके,नागो ईखारे,प्रदीप दोडके तथा असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.