वेकोली उर्जाग्राम येथे अस्वलाचे दर्शन

✒️भद्रावती(Bhadrawati विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

भद्रावती (दि.8 जानेवारी) : – येथून जवळच असलेल्या वेकोली उर्जाग्राम येथे मागील काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचा वावर वाढलेला आहे. वेकोली परिसरात शनिवारी रात्री अस्वलाने दर्शन दिले. मागील आठवड्यात वनविभागाने येथून वाघाला जेरबंद केले होते. मात्र आता अस्वलाने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भितीचे वातावरण पसरले आहे.

वेकोली उर्जाग्राम परिसरात मागील काही वर्षांपासून वन्य प्राण्यांचा वावर वाढलेला आहे. सारे जग नववर्षाच्या स्वागताच्या जल्लोषात व्यस्त असताना वन विभागाने मात्र येथून एका वाघाला जेरबंद केले. या घटनेला आठवडा उलटत नाही तोवरच येथे अस्वलाने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांच्या मते येथे दोन अस्वल फिरत आहेत. शनिवारी रात्री दहा-साडेदहाच्या दरम्यान सुरक्षारक्षकांना या अस्वलीने दर्शन दिले. मागील आठवड्यात वाघ पकडल्यानंतर सुद्धा या परिसरात पुन्हा एक वाघ फिरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 

या घटनेबाबत चंद्रपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी जी आर नायगमकर यांच्याशी संपर्क केला असता वेकोली उर्जाग्राम परिसरात अजूनही वाघ आणि अस्वल असल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. वन्यप्राणी मानवी अधिवासात येवू नयेत यासाठी तसेच त्यांना जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून नेहमीच प्रयत्न केले जातात.

मात्र वेकोली उर्जाग्राम परिसरात वन्य प्राण्यांना राहण्यासाठी आवश्यक असलेले झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे एका वाघाला पकडल्यानंतरही दुसरा वाघ त्या ठिकाणी येऊन त्याची जागा घेतो. ही न संपणारी साखळी आहे. उर्जाग्राम वेकोली परिसरात नेहमीच वनविभागाकडून प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येत आहे. मात्र विकोलीनेही या परिसरातील झाडे झुडूपे नष्ट करून व विशेष उपाययोजना राबवल्यास या परिसरात वन्य प्राणी भटकणार नाहीत. तसेच वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान टाळता येईल.