✒️शिरीष उगे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)
भद्रावती (दि.20 जानेवारी) :- येथील लोकमान्य विद्यालय व महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कै.निळकंठराव उपाख्य बाबुराव पाटील गुंडावार यांच्या जयंती समारोहाचे आयोजन दि.२० व २१ जानेवारी रोजी विद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले आहे.
दि.२० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता विद्यालयाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे आणि स्व.निळकंठराव गुंडावार जयंती समारोहाचे उद्घाटन होणार आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार राहणार असून उद्घाटक म्हणून राज्याचे माजी वनमंत्री तथा मूल-बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार राहणार आहेत. तसेच प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे, वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे, लोकमान्य टिळक स्मारक मंडळ चंद्रपूरचे अध्यक्ष ॲड.रवींद्रजी भागवत, लोकसेवा मंडळाचे माजी अध्यक्ष बळवंतराव गुंडावार, माजी सचिव मनोहरराव पारधे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोलीचे प्राचार्य वैभव बोनगीरवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार,आ.किशोर जोरगेवार, आ.देवराव भोंगळे, आ.करण देवतळे या नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्राचार्य वैभव बोनगीरवार यांचाही यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. तसेच ऐतिहासिक शिवकालीन नाणी व वस्तू संग्राहक अमित गुंडावार यांच्या शिवकालीन वस्तुसंग्रह प्रदर्शनीचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
सायंकाळी ६ वाजता गौरव चौथ्या स्तंभांचा या कार्यक्रमाअंतर्गत शहरातील पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच ७ वाजता ‘मुलांना एक घर द्या’ या विषयावर डॉ.बाबा नंदनपवार नागपूर यांची व्याख्यानमाला होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर, पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, संवर्ग विकास अधिकारी आशुतोष सपकाळ, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळकी आणि गट शिक्षणाधिकारी डॉ.प्रकाश महाकाळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दि.२१ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता डॉ.दीपलक्ष्मी भट नागपूर यांचा ‘कर्मयोगिनी अहिल्याबाई होळकर’ या विषयावर एकपात्री प्रयोग सादर होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार राहणार आहेत.
सायंकाळी ६ वाजता भारत विभूषण आणि पं.अजितकुमार कडकडे व पं.वसंत जळीत यांचे शिष्य डॉ.अमितकुमार लांडगे वर्धा यांचा सुरेल गीत गायनाचा कार्यक्रम ‘संगीत रजनी’ सादर होणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर आणि राज्याच्या माजी मंत्री शोभाताई फडणवीस आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार आणि लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन सरपटवार यांनी केले आहे.