✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि.8 ऑक्टोबर) : – वरोरा – भद्रावती – चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष राजेंद्र मर्दाने यांच्या नेतृत्वाखाली खेमचंद नेरकर, अशोक बावणे आणि प्रवीण गंधारे यांनी रेल्वे संबंधित विविध न्याय्य मागण्यांसाठी आज येथील उप विभागीय कार्यालयासमोर साखळी उपोषणास दमदारपणे सुरुवात केली असून समाजाच्या विविध थरातील नामवंत व्यक्तींनी, समाजसेवकांनी व जनप्रतिनिधींनी उपोषण मंडपाला भेट देऊन तसेच भ्रमणध्वनीद्वारे जाहीर पाठिंबा दिल्याने रेल्वे प्रशासनाचे व सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
पहिल्याच दिवशी समाजाच्या विविध थरातील नामवंत व्यक्तींनी उपोषण मंडपास भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केल्याने उपोषणकर्त्यांचे मनोधैर्यही कमालीचे वाढल्याचे निदर्शनास आले.
याबाबत विशेष वृत्त असे की, मागील सुमारे १५ वर्षांपासून रेल्वे प्रवासी संघ तसेच वरोऱ्यातील जागरूक नागरिक रेल्वे संबंधित विविध मागण्या शासनदरबारी मांडत आले आहेत. विविध वर्तमानपत्रांच्या बातमीदारांनी देखील वेळोवेळी प्रवाशांच्या समस्या पोटतिडकीने वर्तमानपत्रांत मांडून सत्ताधाऱ्यांचे, जनप्रतिनिधींचे व संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.परंतु अपवाद वगळता प्रवासी संघाच्या पत्राला उत्तर देण्याचे साधे सौजन्यही दाखविण्यात आले नाही.
विविध एक्सप्रेस गाड्यांचा थांबा वरोरा येथे मिळावा , कोरोना संक्रमण काळात रद्द केलेल्या रेल्वे गाड्या पुन्हा सुरू कराव्या,बल्लारशहा ते पुणे व मुंबईसाठी दररोज एक्सप्रेस गाडी सुरू करण्यात यावी, बल्लारशहा ते नागपूर,वर्धा, अमरावती, शेगावसाठी इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करावी, बल्लारशहा ते हावडा नवीन एक्सप्रेस सुरू करावी,रेल्वे स्टेशनवर डिस्प्ले बोर्ड, पोजिशन इंडिकेटर लावावे, स्वयंचलित पायऱ्या व लिफ्टची सोय व्हावी,वरोरा स्टेशनच्या पश्चिमेस नवीन तिकीट घर सुरू करावे,स्टेशनवर दुसरा फूट ओव्हर ब्रिज बनविण्यात यावा,नागपूर-जबलपूर एक्सप्रेस चा विस्तार बल्लारशहापर्यंत करावा,बल्लारशहा ते वर्धा मेमु सायंकाळी सहा ऐवजी पाच वाजता सोडण्यात यावी ,अशा एकूण १२ मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू आहे.
यात विशेष बाब ही की,रेल्वे प्रशासनाने हुकूमशाही पध्दतीने मागणीनुसार विविध एक्सप्रेसना थांबा तर दिला नाहीच उलट ज्या गाड्या सुरू होत्या त्याही बंद करण्याचा उद्दामपणा केला आहे.
परिणामतः सर्वसामान्य नागरिकांना, विद्यार्थ्यांना, शासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यापाऱ्यांना बसने प्रवास करण्याची नामुष्की ओढवली असून ते आर्थिकदृष्ट्या पिळल्या जात आहेत. एकंदरित नागरिकांना नाहक शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
उपोषणकर्ते हे सामाजिक बांधीलकी जपणारे असल्याने सर्वसामान्य नागरिकांचा उपोषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. उपोषण मंडपाला भेट देणाऱ्यामध्ये ज्येष्ठ नागरिक संघाचे वरोरा सचिव मारोतराव मगरे, रोटरी क्लब ऑफ वरोरा अध्यक्ष बंडू देऊळकर, अधिवक्ता गजानन बोढाले,जयंत ठाकरे, विनोद हरले, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दत्ता बोरेकार, ज्येष्ठ भाजपा नेता बाबा भागडे, सामाजिक कार्यकर्ते किशोर उत्तरवार, मधुसूदन टिपले, महिला नेत्या योगिता लांडगे, सुनंदा पिदुरकर, वंदना दाते, राजेंद्र मालू, संदीप गांधी इ. चा प्रामुख्याने समावेश होता.
सुरुवातीला उपोषणकर्त्यांनी दीपप्रज्वलनानंतर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी प्रवासी संघाचे राहुल देवडे, बबलू रॉय, जगदीश तोटावार, विलास दारापूरकर, प्रवीण सुराणा, विवेक बर्वे, छोटुभाई शेख, शाहिद अख्तर, डॉ. प्रवीण मुधोळकर, ठाकुरदास मर्दाने, जुबेर कुरेशी, तुषार मर्दाने इ.दी उपस्थित होते.