✒️भद्रावती (Bhadrawati विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
भद्रावती(दि.6 ऑक्टोबर) :- साहित्य हे माणसाला नवी दिशा देणारे व माणसाला सामाजिक दातृत्वाची अनुभुती देणारे ठरते,ते जर बालमनावर बिंबले तर त्याचे दुरगामी परिणाम समाजाला दिशादर्शक ठरतात.समाजाला व नव्या पिढीला नक्कीच एका नव्या अपेक्षित वळणावर पोहोचवितात.
नुकतेच वरोरा तालुक्यातील शेगांव बु. येथे राज्यस्तरीय बाल साहित्य संमेलन “कवितेच्या घरी” पार पडले.मुख्य प्रवर्तक मा.श्रीकांत पेटकर व परिवार यांनी आपल्या जन्मभुमीतील घराला कवितेचे घर म्हणुन संकल्पित केले.या अंतर्गत साहित्य हे समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचावे यासाठी मागील तीन वर्षापासून ते सातत्याने अनेक उपक्रम घेतात.
दि.५ आक्टोबर २०२४ ला झालेल्या या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक मा.एकनाथजी आव्हाड,मुंबई, तसेच प्रसिद्ध चित्रकार पुंडलीक वझे,मुंबई,बाल काव्यसंमेलनाध्यक्ष मा.विजय कदम (विजो)मुंबई,मा.पंडीत लोंढे व मा.नरेश बोरीकर सर चंद्रपूर,मा.श्रीकांत पेटकर व परिवार,मा डाँ संदीप भेले यांचे उपस्थितीत पार पडले.या राज्यस्तरीय बाल साहित्य संमेलनात PMSHRI जि.प.उ.प्रा.शाळा,चंदनखेडा येथील १५ विद्यार्थ्यांच्या स्वलिखित कवितांचे बहारदार सादरीकरण झाले.साहित्य हे जाणीवपणे ग्रामीण समाजात रुजविले जावे यासाठी परिसरातील ब-याच शाळातील बाल कवींसाठी त्यांचे मार्गदर्शकांनी हा साहित्यिक मंच उपलब्द करुन दिला.अशा दिलेल्या संधीबद्दल लहान बालके तर सुखावले सोबत पालकांना अशा उपक्रमात आपल्या मुलांना दिलेल्या संधीचे कौतुक वाटले.या उपक्रमाने अनेक मने सुखावले.बालकांचा आनंद ओसंडून वाहत होता…
बालकांच्या संस्कारक्षम विकासासाठी गुणात्मक बदलाबरोबर सामाजिक भान जपणारे अनेक उपक्रम ही जि.प.चंदनखेडा ही शाळा घेत असते. यातीलच बालकांना सामाजिक स्तरावरील उपक्रमात संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न शाळा करित आली आहे.”साहित्य हे लाखो कानी पडो,अनेकांच्या मुखातूनही वदो,मनात नव्या उर्जेची ठिणगी पडो,आणि शब्द लेखणीतून कागदावर झडो..!” अशा आशेने ग्रामिण बालकांना हा अनुभव देण्याचा प्रयत्न यासाठी हा मंच उपलब्द करुन देण्याचा केवळ नि केवळ प्रयत्न होता.या बद्दल समाजातील सर्व घटकांकडून व शाळेचे मु.अ.व शिक्षक,शा.व्य.स. व ग्रा.पं.चंदनखेडा यानी कौतुक केले.
नव बालकवींनी सादर केलेल्या बोलीतील,अस्खलित,ओबडधोबड का असेना पण आपल्या मनातला भाव ओतणा-या स्वलिखित काव्य रचना,स्वलिखित कथा,गोष्टींचे सादरीकरण केले.उद्याचे भावी साहित्यिक तयार होण्याचा मानस अनेक दिग्गजांनी व्यक्त केला.ह्या रचना अनेक विषयावर सादर झाल्या.”माझा दारुडा बाप”,माय,छत्रपती शिवाजी,पुस्तक,जिजाई,सावित्रिबाई,माझा भिमराव इत्यादी विषयावरील कविता सादर झाल्या स्वतःच्या अनुभवातून आतल्या भोगत असलेल्या भावनातून अनेक रचना बालकांनी शब्दात उतरविलेल्या होत्या.सर्वांना लाजवेल अशा काव्यसादरीकरणातून बालकांनी उपस्थितांची व रसिकांची मने जिंकली.त्यावर मान्यवर दिग्गजांनी दाद दिली.मार्गदर्शक पंडीत लोंढे सर यांचा सन्मान “कवितेचे घर” या साहित्य उपक्रमाद्वारा मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.
मंचावर मार्गदर्शक दिग्गज असतांना आपल्या विद्यार्थ्यांच्या शब्दातील दमदार रचनांचे दर्शन देणारा मंच पाहुन “याचि देही याचि डोळा,अनुभवला बालकांच्या आनंदाचा सोहळा” अनुभवला.
उपस्थितांनी केलेले कौतुक पाहुन बालकांचे मन प्रसन्न व समाधानी झाले. विद्यार्थ्यांचे झालेले कौतुक उद्याचा एक साहित्यिक जन्माला नक्कीच येईल. अशाच साहित्यातून वाचन व लेखन वाढून ती बालके भविष्याचा वेध घेतील.”कवितेचे घर” या संकल्पनेतील उपक्रमाचे खूप समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.