🔸पावसामुळे खराब झालेल्या जिल्ह्यातील रस्त्यांचा घेणार आढावा
✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.15 ऑगस्ट) : – राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार उद्या (शुक्रवार, दि. १६ ऑगस्ट) चंद्रपूर जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसंदर्भात अत्यंत महत्त्वाची बैठक नियोजन भवन येथे घेणार आहेत. या बैठकीमध्ये ते संपूर्ण जिल्ह्यातील रस्त्यासंदर्भात परिस्थितीचा आढावा घेतील.
गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः रुग्णवाहिकांसह अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एकूणच जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी पावसामुळे किंवा इतर कारणांमुळे रस्ते खराब झाले आहेत, त्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्याच्या संदर्भात ना. श्री. मुनगंटीवार यांनी पावले उचलली आहेत.
यासंदर्भात जिल्ह्यातील रस्त्यासंदर्भात परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवार दि. १६ ऑगस्टला सायंकाळी ५.३० वाजता चंद्रपूर येथील नियोजन भवनात ही बैठक होईल. राष्ट्रीय महामार्ग, राज्यमहामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते ,जिल्हा परिषद अंतर्गत येणारे रस्ते, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत हद्दीतील रस्ते तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यांचाही आढावा घेण्यात येणार आहे.
बैठकीला चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग मुख्य अभियंता, चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधिकक्ष अभियंता, कार्यकारी अभियंता आदींना यावेळी उपस्थित राहण्याचे निर्देश ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिले आहेत.