🔹जेष्ठ समाजसेवक केशवराव वरखडे यांची मागणी
✒️शुभम गजभिये चिमूर (Chimur प्रतिनिधी)
चिमूर(दि.10 ऑगस्ट) :- आज भारत देशाला स्वातंत्र्य मिळुन ७६ वर्षे पूर्ण होत आहेत. ते स्वातंत्र्य मिळविण्यासाठी चिमुर शहराची फार मोलाची भुमिका आहे. चिमुरातील कित्येक स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुत्ती देवुन आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवुन दिले आहे. चिमुर क्रांती जिल्हा घोषीत झाल्यास स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना हीच खरी श्रध्दांजली ठरेल. येत्या १६ ऑगस्ट पुर्वी क्रांती जिल्हा घोषीत करण्याची मागणी जेष्ठ समाजसेवक, संपादक केशवराव वरखडे आदीसह चिमुरकरांनी उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,, उपमुख्यमंत्री व महसुलमंत्री यांना सादर केलेल्या निवेदनातुन केली आहे.
सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिमुर या शहरापासुन चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदीया, वर्धा, यवतमाळ या प्रत्येक जिल्हयाचे अंतर १०० कि. मी. च्या वर असुन चिमुर हे शहर मध्य ठिकाणी उमा नदीच्या तिरावर वसलेले आहे. चिमुर हे लोकसभा व विधानसभा क्षेत्र आहे.
संपुर्ण भारत देश स्वातंत्र्य होण्यापुर्वीच चिमुर हे १६ ऑगस्ट १९४२ ला प्रथम स्वातंत्र्य होणारे चिमुर हेच शहर. वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या खंजेरीच्या भजनाने संपुर्ण चिमुर शहर पेटुन उठले व या क्रांतीतुन चिमुर शहर स्वतंत्र झाले. चिमुर लगतच आंतरराष्ट्रीय दर्जाचे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. तसेच दगडी कोळसा सुध्दा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच प्रेक्षणीय स्थळांमध्ये रामदेगी, मुक्ताई, सातबहिणी डोंगर, नवतळा येथील पर्यटकांना आकर्षित करणारा धबधबा लाभलेला आहे. प्रशासकीय यंत्रणेव्दारे झालेल्या सव्र्व्हेनुसार चिमुर जिल्हयाचे नाव जिल्हा होण्यासाठी नविन जिल्हयाची यादीत समाविष्ठ आहे.
निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात जेष्ठ समाजसेवक, संपादक केशवराव वरखडे यांचेसह चिमुर बार असोशिएशनचे अध्यक्ष अॅड. सोनडवले, महेशदत्त काळे, धनराज वंजारी, बोमेवार, राजु मुरकुटे, शैनेशचंद्र श्रीरामे, संदिप हिंगे, सोनलचंद्र श्रीरामे, आर. जी. राखुंडे, नितीन रामटेके, एस. टी. नन्नावरे, संजीवनी सातारडे, डॉ. दिलीप शिवरकर, विनोद अढाल, अब्दुल पाटील, डॉ. संजय पिठाडे, ग्रंथमित्र-समाजसेवक सुभाष शेषकर, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत डवले, केमदेव वाडगुरे, अब्दुल रफीक बाबुमिया शेख आदी उपस्थित होते.