यशवंतराव चव्हाण मुक्त घरकुल योजनेचे १७५० प्रस्ताव धूळ खात 

🔸प्रस्ताव मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्याची ग्रामसंवाद सरपंच संघटनेची मागणी

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि .20 सप्टेंबर) :- शासनाकडुन एन टी प्रवर्गासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना राबविण्यात येते.पंचायत समिती वरोरा व भद्रावती अंतर्गत ग्रामपंचायतीने एन टी प्रवर्गातील १७५० लाभार्थ्यांचे घरकुल बाबत प्रस्ताव पंचायत समितीला सादर केले. पंचायत समितीने सदर प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवले.

परंतुअजुनपर्यंत वरिष्ठ स्तरावर सदर प्रस्ताव अद्याप धूळ खात आहेत. या लाभार्थ्यांच्या घरकुल संबंधाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही वरिष्ठ स्तरावरून झालेली नसल्यामुळे संबंधित लाभार्थी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन आपला रोष व्यक्त करीत आहे. परिणामी सदर लाभार्थ्यांचे प्रस्ताव त्वरित मंजूर करून त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी ग्रामसंवाद सरपंच संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू चिकटे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा आणि भद्रावती वगळता इतर पंचायत समितीतील ग्रामपंचायतीला यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेच्या लाभासाठी पंचनामे होऊन त्यांना लाभ प्राप्त झालेला आहे. त्याच धर्तीवर वरोरा व भद्रावती पंचायत समिती अंतर्गत येणा-या ग्रामपंचायतीतील एन टी प्रवर्गातील गरजु लाभार्थ्याना सदरील योजनेचा तात्काळ लाभ मिळणे क्रम प्राप्त होते. परंतु पंचायत समितीने वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतरही अद्याप कार्यवाही झालेली नाही. यावर कार्यवाही करून प्रस्ताव मंजूर करावे तसेच घरकुलांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी या अनुषंगाने ग्राम संवाद सरपंच संघटनेने निवेदनातून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केलेली आहे. निवेदन सादर करताना राजू चिकटे जिल्हाउपाध्यक्ष ग्राम संवाद सरपंच संघटना जिल्हा चंद्रपूर,

पुरुषोत्तम पावडे वरोरा तालुका अध्यक्ष ,नयन जांभुळे भद्रावती तालुका अध्यक्ष, प्रविण भोयर सरपंच वनली ,राजु डोंगे संचालक कृ. उ बा भद्रावती, अरुण बरडे उपसरपंच पिजदूरा ,धनराज पायघन सरपंच मांगली, संजय घागी माजी संचालक वरोरा, दिनेश कष्टी संचालक कृ. उ बा वरोरा यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.